Mumbaikars should cooperate for structural audit | स्ट्रक्चरल ऑडिटसाठी मुंबईकरांनीही सहकार्य करावे!
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी मुंबईकरांनीही सहकार्य करावे!

मुंबई : सीएसएमटी येथील पादचारी पुलाचा भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुलांच्या; विशेषत: पादचारी पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर पुलांमध्ये त्रुटी आढळूनही दुरुस्तीबाबत कार्यवाही केली जात नाही. प्रशासन वेळेकाढूपणा करते आणि दुर्घटना घडतात. मात्र, अशा घटना घडू नयेत, म्हणून पोलीस, वाहतूक विभाग आणि मुंबईकरांसह प्रत्येक प्राधिकरणाने सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे मत स्ट्रक्चरल ऑडिटरकडून व्यक्त करण्यात आले. कारण अशा पद्धतीने सहकार्य झाल्यास भविष्यातील दुर्घटना घडणार नाहीत, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

माटुंगा येथील व्हिजेटीआयच्या स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि स्ट्रक्चरल ऑडिट तज्ज्ञ डॉ. अभय बांबोले यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, आपण एखादा पूल हेव्ही लोडसाठी वापरतो आहे, तेव्हा तो सुस्थितीत आहे की नाही, तो वापरता येईल की नाही? हे तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. वयोमानानुसार तो पूल समजा कमी क्षमतेचा झाला असेल, तर तो कमी लोडिंगसाठी वापरता येईल, हे स्ट्रक्चरल ऑडिटद्वारे निदर्शनास येते. पादचारी पुलाबाबत बोलायचे झाल्यास मीटरमधील अंतर मोठे असेल, तर प्रत्येक मीटरवरील साइडसह मधला भागही तपासणे गरजेचे असते. स्ट्रक्चरल ऑडिटरला जेव्हा एखादे काम मिळते, तेव्हा त्याला लोकांनी, पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने सहकार्य करणे गरजेचे असते.

कारण वाहतूक पोलीस आणि पोलीस यांचे सहकार्य मिळाले, तर त्याला उत्तमप्रकारे काम करता येते आणि यासाठी ज्या प्रशासनाकडून काम मिळाले आहे, त्यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असते. स्ट्रक्चरल ऑडिट करताना बांधकामाचा प्रत्येक भाग तपासणे गरजेचे असते. कारण बांधकामावर प्रत्येक गोष्ट म्हणजे ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होत असतो. परिणामी, प्रत्येक बाजूने बांधकाम तपासणे हा स्ट्रक्चरल ऑडिटचा महत्त्वपूर्ण भाग आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर सादर झालेल्या अहवालावर प्रशासनाने कार्यवाही करणे भाग असते. समजा अहवालात त्रुटी आढळल्या असतील, त्या क्षणी संबंधित बांधकामाची दुरुस्ती हाती घेणे गरजेचे असते. अनेक वेळा होते असे की, अहवाल सादर झाल्यानंतर बांधकामाची दुरुस्ती हाती घेण्यासाठी वेळ लागतो किंवा काही कारणात्सव दुरुस्ती हाती घेतली जात नाही. परिणामी, बांधकामाची अवस्था वाईट होते आणि दुर्घटना घडते. कामाची गुणवत्ता १०० टक्के, सहकार्याची भूमिका ठेवणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे, हे यावरील उपाय असल्याचे बांबोले यांनी सांगितले.

मुंबईकरांनो, थोडी कळ सहन करा!
पोलीस, वाहतूक पोलीस आणि मुंबईकरांनी सहकार्य करणे गरजेचे असते. वाहतूक विभाग आणि पोलिसांनी वेळेत परवानगी दिली. कार्यवाहीसाठी वेळ दिला. मुंबईकरांनी थोडी कळ सहन केली, तर बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट वेळेत होते. हे वेळेत झाले, तर आवश्यक असलेली दुरुस्ती हाती घेता येते. परिणामी, दुर्घटना टळते.

मोनोचे स्ट्रक्चर उत्तम
मोनो रेल्वेच्या स्ट्रक्चरची बांधणी उत्तम आहे. गुणवत्तेमध्ये तडजोड करण्यात आलेली नाही. मोनो रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे बांधकाम योग्य असून, त्याच्या तपासणीतून कुठेही त्रुटी आढळलेल्या नाहीत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

५ वर्षांनी आॅडिट करावेच!
नव्या पुलाच्या बांधकामाचे आयुष्य शंभर वर्षे असते.
पहिली वीस वर्षे प्रत्येक वर्षी प्रशासनाने बांधकामाची तपासणी करणे गरजेचे असते.
प्रत्येक पाच वर्षांनी स्ट्रक्चरल आॅडिटरने स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असते.


Web Title: Mumbaikars should cooperate for structural audit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.