मुंबईचा चेहरामोहरा बदलणारच! मुख्यमंत्र्यांनी केले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:45 AM2018-02-20T03:45:53+5:302018-02-20T03:46:02+5:30

मुंबईच्या पायाभूत सुविधा व अन्य प्रकल्पांसाठी आपल्या कार्यालयात वॉर रूम उघडणारे मुख्यमंत्री फडणवीस हे आज जगातील अव्वल उद्योगपतींसमोर व्हिजन मांडताना जणू मुंबईचे सीईओच बनले.

Mumbai will change face! PowerPoint presentation by the Chief Minister | मुंबईचा चेहरामोहरा बदलणारच! मुख्यमंत्र्यांनी केले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन

मुंबईचा चेहरामोहरा बदलणारच! मुख्यमंत्र्यांनी केले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन

Next

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रचंड मोठे जाळे उभारून आणि पाच लाख घरांच्या निर्मितीसह विविध योजना हाती घेऊन मुंबईचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षांत बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी देशविदेशातील नामवंत उद्योगपतींना दिला.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८’ या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आज विकासाचे व्हिजन मांडले. मुंबईत येणाºया गुंतवणुकीचा भार सहन करण्याची क्षमता या शहरात आहे आणि ते आम्ही करूदेखील; पण प्रश्न आहे तो त्याला सुसंगत वाहतूक व्यवस्था आणि परवडणारी घरे निर्माण करण्याचा. या दोन्ही बाबींना आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. आपल्या सरकारने अलीकडेच केलेल्या सामंजस्य करारांद्वारे येत्या काही वर्षांत पाच लाख परवडणारी घरे मुंबईत उभी राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मेट्रो, मोनोचे जाळे, उपनगरीय रेल्वेच्या दर्जात वाढ, सागरी मार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, कुलाबा ते सीप्झ मेट्रोसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक आदींमुळे वाहतूककोंडी दूर होईल. कोणत्याही पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पैशांची मुळीच कमतरता नाही, असा दृढ विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबईच्या पायाभूत सुविधा व अन्य प्रकल्पांसाठी आपल्या कार्यालयात वॉर रूम उघडणारे मुख्यमंत्री फडणवीस हे आज जगातील अव्वल उद्योगपतींसमोर व्हिजन मांडताना जणू मुंबईचे सीईओच बनले. त्यांनी आपल्या व्हिजनबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या सादरीकरणाने प्रभावित झालेले नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत असे सादरीकरण करणारे पहिलेच मुख्यमंत्री मी आज बघत आहे.
‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग’ या आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. राज्याचा आजचा विकास दर ९.४ टक्के आहे. तो आम्ही १५ टक्क्यांपर्यंत निश्चितपणे नेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Mumbai will change face! PowerPoint presentation by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.