उद्या रंगणार मुंबई मॅरेथॉन : भारतीय गटात सेनादलामध्येच चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:43 AM2019-01-19T00:43:13+5:302019-01-19T00:43:31+5:30

इथियोपियन धावपटूंवर असणार लक्ष

Mumbai Marathon to be held tomorrow: Indian team picks up in Army | उद्या रंगणार मुंबई मॅरेथॉन : भारतीय गटात सेनादलामध्येच चुरस

उद्या रंगणार मुंबई मॅरेथॉन : भारतीय गटात सेनादलामध्येच चुरस

Next

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.४० वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये सेनादलाच्या धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याचवेळी एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशांतील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगेल.


यंदाचे १६वे वर्ष असलेल्या या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ४६,४१४ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ८,४१४ मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार ४५७ धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे, खुली १० किमी रन (२,५१६), ड्रीम रन (१७,६६१), वरिष्ठ नागरिक रन (१००५), दिव्यांग (१३०१) आणि पोलीस कप (६० संघ) अशा इतर गटांमध्येही रोमांचक शर्यत रंगेल. एकूण ४ लाख ५ हजार यूएस डॉलर किमतीची बक्षीस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलर्सचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्याचप्रमाणे अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४ आणि ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.


४२ किमी अंतराच्या मुख्य मॅरेथॉन एलिट गटातील सहभागी खेळाडूंपैकी इथियोपियाच्या अबेरा कुमा याची २ तास ५ मिनिटे ५० सेकंदांची अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. यानंतर दुसºया क्रमांकावरील केनियाचा जेकब केंदागर सुमारे २ मिनिटांनी अबेराच्या मागे आहे. त्यामुळे अबेराकडे मुंबई मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते.
विशेष लोकल सेवा


मॅरेथॉनसाठी रविवारी मध्य आणि हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पहाटे प्रत्येकी एक, पश्चिम मार्गावर विरार ते चर्चगेटपर्यंत दोन विशेष जादा लोकल चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरून कल्याण येथून पहाटे ४ वाजून ४१ मिनिटांची लोकल रविवारी ३ वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी स्थानकावर ४.३० वाजता पोहोचेल. हार्बरवरून पनवेल येथून पहाटे ४.०३ वाजताची लोकल पहाटे ३.१० वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी स्थानकावर ४.३० वाजला पोहोचेल. पश्चिम रेल्वे मार्गावरून रविवारी पहिली विशेष लोकल रात्री २.४५ वाजता विरारहून सुटेल. ही लोकल पहाटे ४.२३ वाजता चर्चगेटला पोहोचेल. दुसरी विशेष लोकल पहाटे ३.०५ वाजता विरारहून सुटेल आणि ४.४३ वाजता चर्चगेटला पोहोचेल.


टी. गोपी याच्यावर नजरा
भारतीय धावपटूंमध्ये सेनादलाच्या गोपी थोनाकल याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. गतवर्षी त्याने २ तास १६ मिनिटे ५१ सेकंदांची वेळ नोंदवत सहज बाजी मारली होती. त्यामुळेच यंदाही तो आपले जेतेपद कायम राखण्याच्या निर्धारानेच धावेल. त्याचवेळी त्याला नितेंदर सिंग रावत, रशपाल सिंग आणि करण सिंग यांच्याकडूनही कडवी स्पर्धा मिळेल. महिलांमध्ये गतविजेती सुधा सिंग यंदाही संभाव्य विजेती मानली जात असून ज्योती गवते, श्यामली सिंग, मोनिका राऊत आणि अनिता चौधरी तिच्यापुढे आव्हान निर्माण करतील.

वैद्यकीय व्यवस्था...
सहभागी धावपटूंसाठी चोख व्यवस्था करताना आयोजकांनी पुरेपूर वैद्यकीय व्यवस्था केली आहे. या वेळी संपूर्ण मॅरेथॉनदरम्यान एकूण १२ वैद्यकीय केंद्रे उभारण्यात आली असून ११ रुग्णवाहिका आणि तब्बल ६०० डॉक्टर्सची टीम तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पिण्याच्या पाण्याचे २७ स्टॉल्स उभारण्यात येणार असून या वेळी सुमारे १ लाख ६० हजार लीटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ९ एनर्जी ड्रिंक स्टेशन्स, ११ न्यूट्रीशन झोन्स आणि ११ स्पंज स्टेशन्सही तयार करण्यात आले आहेत.

मॅरेथॉन वेळापत्रक :
मुख्य मॅरेथॉन (हौशी) : सकाळी ५.४० वाजता सीएसएमटी येथून.
मुख्य मॅरेथॉन (एलिट) : सकाळी ७.२० वाजता सीएसएमटी येथून.
अर्ध मॅरेथॉन : सकाळी ५.३० वाजता वरळी डेअरी येथून.
१०के रन : सकाळी ६.२० वाजता सीएसएमटी येथून.

Web Title: Mumbai Marathon to be held tomorrow: Indian team picks up in Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.