मुंबई बनतेय ‘उष्णतेचे बेट’, पर्यावरणतज्ज्ञांकडून भीती व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:17 AM2018-04-11T02:17:47+5:302018-04-11T02:17:47+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. येथील लोकवस्तीमध्येही भर पडत आहे. शिवाय सिमेंट काँक्रीटच्या जंगलात भर पडत असून, काचेच्या इमारतीही वाढत आहेत.

Mumbai is the 'heat island', expresses fear of environmentalists | मुंबई बनतेय ‘उष्णतेचे बेट’, पर्यावरणतज्ज्ञांकडून भीती व्यक्त

मुंबई बनतेय ‘उष्णतेचे बेट’, पर्यावरणतज्ज्ञांकडून भीती व्यक्त

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. येथील लोकवस्तीमध्येही भर पडत आहे. शिवाय सिमेंट काँक्रीटच्या जंगलात भर पडत असून, काचेच्या इमारतीही वाढत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम येथील हवामानावर होत आहे. त्यामुळे मुंबई म्हणजे ‘उष्णतेचे बेट’ बनत चालल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानाने यात आणखी भर घातली असून, यावर उपाययोजना केली नाही, तर भविष्यात समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे.
मुंबई शहरासह उपनगराच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षांमध्ये मुंबईच्या तापमानात दोन ते चार अंशांचा फरकही आढळून येत आहे. हवामानात बदल नोंदविण्यात येत असतानाच येथील बांधकामांतही वेगाने बदल होत आहेत. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वाढ होत असून, काचेच्या इमारतीही मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत. पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भौगोलिक रचना लक्षात घेता अशा इमारती पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा इमारतींमध्ये हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी असते. परिणामी येथील तापमानात वाढ नोंदविण्यात येते. यावर उपाय म्हणून वातानुकूलित यंत्रांचे प्रमाण वाढते. परिणामी वीज अधिक वापरली जाते. सिमेंट काँक्रीटचे रस्ते यात आणखी भर घालत असतात. सिमेंट काँक्रीटचे प्रमाण वाढल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. अशा अनेक समस्या तापमान वाढीस कारणीभूत असून, यावर वेळीच उपाय शोधण्याची गरज आहे.
मुंबई शहरासह उपनगरात सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वाढ होत असून, काचेच्या इमारतीही मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत. पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भौगोलिक रचना लक्षात घेता अशा इमारती पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात.
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत वेगवान उष्णयुगात कार्बन डायआॅक्साईड वायूच्या वाढीचा दर दहा हजार वर्षांत ३०० कोटी टन असा होता. मात्र सध्याचा मानवनिर्मित वेग वर्षाला ६०० कोटी टन असा
आहे. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील ‘बॉन’ येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या तापमानवाढीवरील महत्त्वाच्या परिषदेत जाहीर केले गेले की, आता एवढ्या प्रमाणात कार्बन वातावरणात साठला आहे की, त्यामुळे तापमान वाढण्याची प्रक्रिया अपरिवर्तनीय म्हणजे न थांबणारी झाली आहे.भारतीय पर्यावरण चळवळीचे निमंत्रक अ‍ॅड. गिरीश राऊत यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक तापमान वाढीचा धोका वाढत आहे. सौदी अरेबियाला अभूतपूर्व उष्म्याच्या लाटा, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर, बर्फवृष्टी, वादळे या रूपांत तापमानवाढीचा मोठा फटका बसत आहे.
ही गोष्ट पृथ्वीवर सर्वत्र घडत आहे. महाराष्ट्रात ४४ टक्के क्षेत्राचे वाळवंटीकरण होत आहे. कोकणात गेल्या काही वर्षांपासून १०-१२ अंशाने वाढलेल्या तापमानामुळे, अवकाळी अतिवृष्टी व बर्फवृष्टीमुळे आंबा व
इतर फळे, पिके धोक्यात आली.
त्यांचे व मासळीचे उत्पादन खालावत
आहे.
>हरित बांधकामांवर लक्ष द्या!
धूर ओकत असलेली वाहने समस्यांमध्ये आणखी भर घालत असतात. उष्ण हवा सोडत असलेल्या वातानुकूलित यंत्रांमुळे समस्या उग्र स्वरूप धारण करतात. यावर उपाय म्हणजे आपण हरित बांधकाम करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यावर सर्वांनीच लक्ष केंद्रित करत पर्यावरणस्नेही उपक्रम राबवत अधिकाधिक वृक्ष लावण्याची गरज आहे.

Web Title: Mumbai is the 'heat island', expresses fear of environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.