पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:50 AM2024-03-11T09:50:53+5:302024-03-11T09:53:24+5:30

लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या कोस्टल रोडची वरळी-मरीन ड्राइव्ह अशी एक मार्गिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून खुली करण्यात येत आहे.

mumbai coastal road project to partly open for travel from a one-lane will be open for vehicles | पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार 

पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार 

मुंबई : लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या कोस्टल रोडची वरळी-मरीन ड्राइव्ह अशी एक मार्गिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून खुली करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारपासून मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेवर आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवास करता येणार आहे. तर शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. ‘कोस्टल’मुळे पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.  एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास १२.१९ मी.) आहे. तसेच एकाच  प्रकल्पामध्ये पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर या प्रकल्पात ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित क्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत.

ही आहेत वैशिष्ट्ये-  काेस्टल राेडचा दक्षिणेकडील भाग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असेल.

१) पुलांची एकूण लांबी- २.१९ कि.मी. 

२) रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी. 

३) एकुण मार्गिका संख्या- ८

४) दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका- (४-४)

५) भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी - ४.३५ कि.मी. 

प्रकल्पामुळे होणारे फायदे - 

१)  इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल.

२)ध्वनी आणि वायू प्रदूषणात घट होण्यास मदत. 

३) प्रकल्पात ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत. 

४)  मुंबईकरांना सुरक्षित व जलद प्रवासासोबत सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

अशी असणार वेगाची मर्यादा (प्रति तास) - 

१) सरळ मार्गावर चालवताना - ८० कि.मी. 

२) बोगद्यामध्ये जाताना - ६० कि.मी. 

३) बाेगद्याबाहेर पडताना - ४० कि.मी. 

 या वाहनांना काेस्टलवर प्रवेशबंदी -

१) सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, जड मालवाहने (बेस्ट/एसटी बसेस/प्रवासी वाहतूक करणारी वाहने वगळून) आणि सर्व मालवाहू वाहने.

२)  सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींच्या मोटारसायकल/स्कूटर (साइड कारसह)

३) सर्व प्रकारची तीनचाकी वाहने

४)  जनावरांनी ओढण्यात येणाऱ्या गाड्या, टांगा, हातगाड्या.

५)  पादचारी

Web Title: mumbai coastal road project to partly open for travel from a one-lane will be open for vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.