मुंबई सेंट्रल स्थानक जीवघेणे : अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:09 AM2017-10-06T06:09:55+5:302017-10-07T14:18:05+5:30

मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

Mumbai Central Station fatality: Gudmerto breathing on the narrow bridge | मुंबई सेंट्रल स्थानक जीवघेणे : अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

मुंबई सेंट्रल स्थानक जीवघेणे : अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

googlenewsNext

पूजा दामले
मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्वांत मोठ्या मुंबई सेंट्रल स्थानकावरून प्रवास करणा-या प्रवाशांची ही रोजची व्यथा आहे. फुगणा-या प्रवासी संख्येपुढे स्थानकाचे पूल छोटे वाटू लागले आहेत. या अरुंद पुलावरून जाताना गर्दीमुळे प्रवाशांची दमछाक होत असून, श्वास गुदमरू लागला आहे.

कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी अरुंद पुलावर, तुटलेल्या पायºयांवरून सवयीने पावले पडतात. पण, एखादवेळेस अंदाज चुकल्यास अपघात झाल्यास जीव जाईल, याची भीती मनात नेहमीच घर करून असल्याच्या भावना प्रवाशांनी ‘लोकमत’शी शेअर केल्या. या स्थानकाजवळच महापालिकेचे नायर रुग्णालय आहे. त्यामुळे याच गर्दीतून वाट काढत जाताना रुग्णांनाही रोजचा त्रास सहन करावा लागत आहे.


अनेकदा याविषयी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधूनही पुलाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मुंबई सेंट्रल स्थानकावर चार फलाट असून, पुढे टर्मिनस आहे. तसेच, या स्थानकाच्या बाहेर एसटीचे आगार आहे. त्यामुळे या स्थानकावर लोकलचे प्रवासी, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रवासी आणि एसटीचे प्रवासीही प्रवास करत असतात. त्यामुळे या स्थानकावर दिवसभर गर्दी असतेच. स्थानकाच्या दोन्ही फलाटांची रुंदीही कमी आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही फलाटांवर गाड्या एकत्र आल्यावर पुलावर आणि फलाटावर गर्दी झाल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो.

रुंदीकरण आवश्यक
पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल हे सर्वांत मोठे स्थानक आहे. या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. या स्थानकावरून लाखो प्रवासी ये-जा करताात. येथील पूल अरुंद असून त्याची दुरवस्था झाली आहे. एल्फिन्स्टन स्थानकाच्या घटनेनंतर सर्वच पुलांसाठी वेगळा निधी देण्याची गरज आहे. माझ्या भागातील हँकॉक पुलाची दुरवस्था झाली होती. हा पूल गेल्या दीड वर्षापासून पाडला आहे. पण, अद्याप येथे काम सुरू झालेले नाही. महापालिका आणि रेल्वेच्या भांडणात हे काम अडकले आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुलाचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासाठी पाठपुरावा करत आहे.
- वारिस पठाण, स्थानिक आमदार


खाण्याचे स्टॉल्स नकोत
मुंबई सेंट्रल स्थानकावरून लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. जवळच एसटी स्थानक आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरातसह कोकणात जाणारे येथूननच प्रवास करतात. त्यामुळे येथे गर्दी असते. येथील पूल अरुंद आहेत. पुलाची समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. प्रत्यक्षात येथील फलाटावर आवश्यक नसणारे खाण्याचे स्टॉल्स काढले पाहिजेत. यामुळे दोन्ही बाजूने गाड्या आल्यास प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल.
- राजेंद्र नरवणकर, स्थानिक नगरसेवक

ट्रेन पकडताना भीती वाटते
मुंबई सेंट्रल स्थानकावरून रोज प्रवास करताना भीती वाटते. फलाट क्रमांक ३ व ४ वर येतानाचा पूल अरुंद आहे. फलाटावर ट्रेन उभी असल्यास पुलावर गर्दी वाढते. त्यातच वाट काढून गाडी पकडणे म्हणजे दिव्यच आहे.
- दर्शना चांदुर, प्रवासी

अपघाताचा धोका
मुंबई सेंट्रल स्थानकावर नेहमीच गर्दी असते. चार फलाट असूनही फास्ट आणि स्लो ट्रेन एकत्र आल्यास गर्दी अधिक वाढते. या फलाटावर पुलांची संख्या जास्त असली तरी रुंदी कमीच आहे. दोन्ही फलाटांवर ट्रेन आल्यास फलाटावरून चालणे प्रवाशांना शक्य होत नाही. कारण, फलाटांची रुंदी कमी आहे. पुलावर चढल्यावर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटावर पूल जातो. या पुलाची लांबी कमी आहे. यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर अपघात होण्याचा धोका अधिक आहे.
- भारतभूषण साळवे, प्रवासी

सायंकाळी मुंबई सेंट्रल स्थानकावर फास्ट लोकल थांबतात. त्यामुळे पुढच्या स्थानकांवर जाण्यासाठी प्रवासी संख्या अधिक असते. फलाटाची उंचीही कमी असल्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास-उतरण्यास त्रास होतो. या स्थानकातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरचा पूलही अरुंद आहे. त्यामुळे येथेही गर्दी असते. या स्थानकाचा आवाका मोठा असला तरीही पूल लहानच आहेत. या ठिकाणी रुंदीकरणासह दुरुस्तीची गरज असल्याची मागणी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Web Title: Mumbai Central Station fatality: Gudmerto breathing on the narrow bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.