मुंबई : मित्रासोबत सेल्फी काढल्याच्या रागात प्रियकराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ओशिवरा परिसरात घडला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एकाला अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी पीडित मॉडेल आरती (नावात बदल) यांची ओळख संजय कटेल या कास्टिंग डायरेक्टरसोबत झाली. तीन महिन्यांपूर्वी आरतीला संजय यांनी कामासाठी एका कंपनीचा असोसिएट डायरेक्टर रक्षित आनंद (28) याच्याकडे पाठविले.

या ओळखीनंतर सोबत काम करताना आरती आणि आनंदची मैत्री झाली. ज्याचे काही दिवसांनी प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्याने आरतीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र आनंदची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने ती सुधारल्यानंतर आपण लग्न करू, असे तिने त्याला सांगितले. दरम्यान, तिने आनंदला लाखभर रुपयांची मदतदेखील केली.

तिच्या घरच्यांनी तिचे लग्न तिच्या एका जुन्या मित्रासोबत जुळवले. मात्र तिने त्याला नकार दिला. मात्र 8 आॅक्टोबर रोजी संजयच्या वाढदिवसाला आरतीच्या लोखंडवाला परिसरातील फ्लॅटमध्ये आरती, संजय, एक मित्र अजय जांगड आणि आनंद पार्टी करत होते. त्या वेळी संजयसोबत सेल्फी काढताना आनंदने आरतीला पहिले. संजय सोबत आरतीला सेल्फी काढताना पाहून आनंदचा पारा अचानक चढला आणि  रागात तो तिला खेचून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या संजय आणि अजयने तिला वाचविले असे तिने पोलिसांना सांगितले.