शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 10:11 IST2018-11-24T10:03:18+5:302018-11-24T10:11:00+5:30
शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सेनेवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर
मुंबई - शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सेनेवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. 'अयोध्येला निघालो जोशात... राजीनामे मात्र अजूनही खिशात' असे पोस्टर मनसेने शनिवारी (24 नोव्हेंबर) लावले आहे. शिवसेना भवनासमोर या आशयाचे पोस्टर झळकले आहेत.
मनसे आणि शिवसेना यांच्यातील पोस्टरयुद्ध नवीन नाही. याआधीही मनसेने याच मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्यासाठी थेट शिवसेना भवनासमोरच पोस्टर लावले होते. त्यामध्ये अयोध्यावारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील गंभीर प्रश्नांचे काय, असे प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र खड्डेमुक्त होणार का, वाढती महागाई कधी रोखणार, बेरोजगारी कमी होणार का, शेतकरी आत्महत्या थांबणार आहेत का, महिला सुरक्षित राहणार काय, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार थांबणार काय असे प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आले होते. शेवटी खिशातील राजीनामे बाहेर पडणार काय, असा टोलाही 'मनसे'ने याआधी लगावला होता.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 24, 2018
राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. रविवारी (25 नोव्हेंबर) उद्धव ठाकरेयांचा अयोध्या दौरा असल्यानं तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादिवशीच विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. एकूणच राम मंदिर निर्माणावरुन पुन्हा राजकारण तापू लागले आहे.