मोनोच्या देखभालीसाठी कंत्राटदार मिळेना, फेब्रुवारीमध्ये मोनोरेल सुरू करण्याचा एमएमआरडीएचा दावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:05 AM2018-01-29T06:05:14+5:302018-01-29T06:05:28+5:30

मोनोरेलच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला कंत्राटदार कंपनी हवी आहे. परंतु तीन वेळा कंत्राटदारांसाठीच्या निविदा काढल्यानंतर अद्याप एकही कंत्राटदार मिळाला नाही, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

 MMRDA claims to start monorail in February | मोनोच्या देखभालीसाठी कंत्राटदार मिळेना, फेब्रुवारीमध्ये मोनोरेल सुरू करण्याचा एमएमआरडीएचा दावा  

मोनोच्या देखभालीसाठी कंत्राटदार मिळेना, फेब्रुवारीमध्ये मोनोरेल सुरू करण्याचा एमएमआरडीएचा दावा  

Next

मुंबई  - मोनोरेलच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला कंत्राटदार कंपनी हवी आहे. परंतु तीन वेळा कंत्राटदारांसाठीच्या निविदा काढल्यानंतर अद्याप एकही कंत्राटदार मिळाला नाही, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. परिणामी भविष्यात एमएमआरडीए कंत्राटदारासाठी पुन्हा एकदा निविदा काढणार आहे.
९ नोव्हेंबर रोजी मोनोरेलच्या दोन डब्यांना सकाळी म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळ आग लागली होती. या घटनेला आता तीन महिने होत आले तरीही अद्याप मोनोरेल सुरू झालेली नाही. सुरुवातीला ३१ डिसेंबर २०१७ रोजी मोनोरेल सुरू होईल, असे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता फेब्रुवारी २०१८ मध्ये मोनो सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना आणि मोनोच्या देखभालीसाठी कंत्राटदारच नसताना मोनो फेब्रुवारीमध्ये कशी काय सुरू होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.
तिकिटांचे दर वाढणार?
मोनोच्या तिकिटांचे दर सध्या पाच रुपये ते अकरा रुपयांपर्यंत आहेत. परंतु येत्या काळात दोन्ही टप्प्यांतील मोनो सुरू होईल, त्यामुळे मोनोच्या तिकिटांचे दरही वाढवले जाणार असल्याचे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले. मोनोरेल
सुरू झाल्यानंतर मोनोरेलच्या तिकिटांचे दर १० रुपये ते ४० रुपये होतील.
प्रवासी वाढण्याची अपेक्षा
पहिल्या टप्प्यातील मोनोला मुंबईकरांकडून फारच कमी प्रतिसाद मिळाला असला तरीही दोन्ही टप्प्यांतील मोनो सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढण्याची एमएमआरडीएला अपेक्षा आहे.

मोनोच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु कंत्राटदारांकडून निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीपासून मोनोच्या सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी स्कोमी या कंपनीकडे होती. या कंपनीनेदेखील निविदा काढल्यानंतर पुन्हा एकदा निविदांसाठी अर्ज केला नाही. तरीही नवा कंत्राटदार मिळेपर्यंत जुनी कंपनीच मोनोच्या देखभालीची जबाबदारी संभाळेल.
- दिलीप कवठकर,
प्रकल्प संचालक, एमएमआरडीए

Web Title:  MMRDA claims to start monorail in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई