मेट्रोसाठी आरेचा बळी देणार नाही!

By admin | Published: June 12, 2015 05:51 AM2015-06-12T05:51:03+5:302015-06-12T05:51:03+5:30

आरे कॉलनीतल्या ७५ एकर जागेवरील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली असतानाच दुसरीकडे

Metro will not be burnt! | मेट्रोसाठी आरेचा बळी देणार नाही!

मेट्रोसाठी आरेचा बळी देणार नाही!

Next

मुंबई : आरे कॉलनीतल्या ७५ एकर जागेवरील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली असतानाच दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेडसाठी आरेचा बळी देणार नाही; असा निर्धार पर्यावरणवाद्यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (१२ जून) समितीची बैठक होणार असून, बैठकीदरम्यान समिती आपला अहवाल सादर करणार आहे. परिणामी या बैठकीत अहवाल सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री मेट्रो ३ च्या कारशेडबाबत काय निर्णय घेतात? याकडे पर्यावरणवाद्यांसह सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा एक घटक असलेला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मेट्रो ३ भुयारी प्रकल्प हाती घेतला आहे. आरेमधील ७५ एकर भूखंडावर मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येणार आहे. दुर्दैव म्हणजे कारशेडसाठी येथील तब्बल २ हजार ३०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. परिणामी पर्यावरणवाद्यांनी कारशेडला विरोध दर्शविला असून, कारशेडसाठी पर्यायी जागा सुचविल्या आहेत.
मात्र महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केलेल्या पाहणीनंतर मेट्रो ३ साठी आरेमध्येच कारशेड बांधण्याबाबत केलेले वक्तव्य, या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले स्पष्टीकरण आणि पुन्हा ‘मेट्रो ३ साठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो’ असे वक्तव्य महासूलमंत्र्यांनी केल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढू लागला आहे.
पर्यावरणवादी ऋषी अग्रवाल यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी २ हजार ३०० झाडांचा बळी जाणार आहे. परिणामी यापूर्वीच येथील कारशेडला विरोध दर्शविला आहे. आणि आता कारशेडबाबात झालेल्या वक्तव्यांनी गोंधळात आणखीच भर घातली आहे. तरीही याबाबतचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीची १२ जून (शुक्रवारी) बैठक आहे. या बैठकीत यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे आणि या अहवालानंतर कारशेडबाबतच ठोस निर्णय घेतला जाणार आहे. आम्हीही या निर्णयाची प्रतीक्षा करत असून, सरकारच्या निर्णयानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
सेव्ह आरे ग्रुपचे सदस्य मनीष सेठी यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये उभारण्याबाबत सध्या जो काही गोंधळ सुरू झाला आहे; तो समजण्यापलीकडचा आहे. मुळात यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली आहे. या विषयावर मुख्यमंत्री काम करत आहेत. शिवाय समितीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. मग या विषयाबाबत एवढी मत-मतांतरे का? हाही प्रश्नच आहे. दुसरे असे की, कारशेडसाठी २ हजार ३०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. परिणामी, हा पर्यावरणाचा म्हणजे मुंबईचा प्रश्न आहे. कारशेडसाठी कांजूरमार्गसह उर्वरित ठिकाणे सुचविण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी कारशेड उभारण्याबाबत सरकारने विचार करावा.
वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये बांधण्यापूर्वी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे आयआयटी आणि निरीच्या पर्यावरणतज्ज्ञांची समितीसोबत बैठक झालेली नाही. १२ जून रोजी होणाऱ्या या बैठकीमध्ये समितीचा अहवाल सादर होणार आहे. परिणामी, उद्याच्या बैठकीत अहवाल सादर झाल्यानंतर जो निर्णय होईल; त्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधली जागा देऊ देणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Metro will not be burnt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.