- विशेष प्रतिनिधी

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविले, पण मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांनाही पदावर कायम राहण्यास सांगून त्यांचे राजीनामे फेटाळले.
मुंबईतील एसआरए व अन्य गृहनिर्माण प्रकल्पांत मोठे घोटाळे केल्याचा आरोप असलेले प्रकाश मेहता, शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. मेहता यांच्यावरील आरोपांची लोकायुक्तांमार्फत तर देसार्इंवरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची घोषणा फडणवीस यांनी काल विधिमंडळात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली होती.
सुभाष देसाई यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला. चौकशी पूर्ण होऊन निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणे आपणास उचित वाटत नाही, अशी भूमिका मेहता व देसाई यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती. तथापि, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे आपण निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन्ही मंत्र्यांना पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावल्याचे समजते.
देसाई यांनी काल रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यानुसार ते आज सकाळी ते मुख्यमंत्र्यांना भेटले.

पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी देसाई यांच्या राजीनाम्याचे नाट्य रचण्यात आले. देसार्इंना विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहीत होते, तर तीन वर्ष ते झोपले होते का? शिवसेनेमध्ये नैतिकता असती, तर गैरव्यवहार उघडकीस आल्यावर तातडीने उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. आता धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा

भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक सुभाष देसार्इंचा राजीनामा मागत आहेत. तरीही नैतिकतेच्या आधारे देसार्इंनी आपल्याकडे राजीनामा दिला. त्यांना मी तो मुख्यमंत्र्यांना देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला आहे. त्यांच्या प्रकरणात नि:पक्षपाती चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आणि तशी चौकशी होईल व सत्य बाहेर येईल, ही अपेक्षा आहे. पक्ष देसार्इंच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई मंत्रिपदावर कायम असताना त्यांच्याविरुद्धची चौकशी नि:पक्षपातीपणे कशी होईल?.या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.भ्रष्ट मंत्री आणि सरकारविरुद्धचा आमचा लढा सुरूच राहील. देसाई यांचा राजीनामा न स्वीकारणारे मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकाश मेहता यांचाही बचाव करीत आहेत.
- धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद