पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीची बैठक तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:48 PM2018-07-27T17:48:16+5:302018-07-27T17:48:23+5:30

पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज सकाळी पी दक्षिण प्रभाग समितीची मासिक बैठक येथील भाजपा व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने तहकूब करून या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला.

Meeting of P Ward Committee to protest against inaction of municipal officials | पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीची बैठक तहकूब

पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीची बैठक तहकूब

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज सकाळी पी दक्षिण प्रभाग समितीची मासिक बैठक येथील भाजपा व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने तहकूब करून या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. पी दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 58 चे भाजपा नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच, भाजपा प्रभाग क्रमांक 52 च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी यावेळी येथील पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या पाढाच त्यांनी वाचला.

आम्हाला नगरसेवक म्हणून दीड वर्षे झाली. नागरिकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांबाबत आमच्याकडून अपेक्षा आहेत.मात्र पालिका अधिकारी येथील विकासकामांकडे सतत दुर्लक्ष करतात.साध्या तक्रारीबाबत आमच्या एसएमएसला उत्तरे देखिल देण्याचे सौजन्य पालिकेचे अधिकारी दाखवत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी केला.प्रभाग क्रमांक 56 च्या भाजपा नगरसेविका राजुल देसाई यांनी देखिल आपल्या विभागात घन कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या आहे.मात्र पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रभाग क्रमांक 50 चे भाजपा नगरसेवक दीपक ठाकूर, प्रभाग क्रमांक 57 च्या भाजपा नगरसेविका श्रीकला पिल्ले उपस्थित होते.शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 54 च्या शिवसेना नगरसेविका व स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) साधना माने, प्रभाग क्रमांक 51 चे शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेबवलकर,प्रभाग क्रमांक 53 च्या शिवसेना नगरसेविका रेखा रामवंशी गैरहजर होते. मात्र आपण साधना माने यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी पी दक्षिण प्रभाग समितीची बैठक तहकूब! करण्यास येथील शिवसेना नगरसेवकांची संमती असल्याची माहिती प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांनी लोकमतला दिली.

मुंबई महानगर पालिकेसह म्हाडा, एमएमआरडी, ट्रॅफिक, मुंबई पोलिस,सार्वजनिक बांधकाम, मेट्रो ही विविध प्राधिकरणे मुंबईत काम करतात. मात्र रस्ते, गटार चोकअप होणे, खड्डे होणे, वाहतूक कोंडी होणे, पाणी तुंबणे तसेच या विविध आस्थापनातील समस्यांसाठी पालिकेच्या नगरसेवकांना लोकप्रतिनधी म्हणून मुंबईकर जबाबदार धरतात आणि नागरिकांचा विनाकारण रोष त्यांना पत्करावा लागतो.

दर महिन्याला प्रभाग समितीची मासिक बैठक वॉर्ड प्रभाग समितीच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते.या बैठकीला वॉर्ड ऑफिसर व सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित असतात.मात्र अनेक बैठकांना म्हाडा,एमएमआरडी,ट्रॅफिक,मुंबई पोलिस,सार्वजनिक बांधकाम,मेट्रो ही विविध प्राधिकरणे पूर्व सूचना देऊन सुद्धा या महत्वाच्या बैठकांना गैरहजार असतात.त्यामुळे के पश्चिम प्रभाग समितीच्या गेल्या 20 जुलैला झालेल्या प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक देखिल तहकूब करण्यात आली होती.तर आज पी दक्षिण प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली.

संदीप पटेल यांनी सांगितले की,पी दक्षिण हा वॉर्ड मोठा असून येथे अनेक समस्या आहेत.नागरिकांनी आम्हाला निवडून दिल्यामुळे त्यांच्या येथील नागरी समस्या सुटल्या पाहिजेत अशी आमच्या लोकप्रतिनिधींची रास्त अपेक्षा असते,मात्र येथील पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, आणि मग सर्व रोष आम्हा नगरसेवकांवर येतो.तसेच मुंबईत काम करणाऱ्या विविध प्राधिकरणाचे अधिकारी प्रभाग समितीच्या बैठकीला गैहहजर राहिल्यामुळे विभागातील एसआरए,मेट्रो,म्हाडा,एमएमआरडी,ट्रॅफिक,मुंबई पोलिस,सार्वजनिक बांधकाम आदी प्राधिकरणाच्या संदर्भात असलेले प्रश्न सुटत नाही.पालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर ते या प्राधिकरणाकडे बोट दाखवतात, आणि मग या प्राधिकरणाचे असलेले वॉर्ड मधील प्रश्न लवकर सुटत नसल्याचा आरोप संदीप पटेल यांनी केला.
याबाबतीत अधिक माहिती देतांना संदीप पटेल यांनी सांगितले की,प्रभाग समितीची स्थापना ही 74 व्या घटनेनुसार सतेचे विकेंद्रीकरणासाठी झाली,मात्र ही प्राधिकरणे सत्तेचे केंद्रीकरण करत आहे.एसआरए फ़क्त आपल्या आख्यारितीत इमारती बांधण्यासाठी एफएसआय देऊन सदर इमारत बांधण्यास परवानगी बिल्डरला देते.मात्र एसआरएच्या कामामुळे प्रभागातील ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन जर चेकअप झाली,तर ही प्राधिकरणे नाममात्र राहतात. सध्या डी एन नगर ते दहिसर मेट्रोचे काम सुरू आहे,या मार्गावर अनेक खड्डे असल्यामुळे व त्यात रस्ता अरुंद झाल्यामुळे या वॉर्ड मध्ये मोठी वाहतूक कोंडी होते,मग याला देखिल आम्हाला दोषी धरले जाते.रस्ता जर खड्डेमय झाला असेल किंवा नवीन रस्ता बनवायचा असेल किंवा खड्डेमुक्त करायचा असेल तर तो पालिकेच्या जागेत म्हाडा,एसआरए,मेट्रो,एमएमआरडी प्राधिकरणाच्या जागेत असा वाद अनेक वेळा होतो.

त्यामुळे या कामांना विलंब होतो.त्यामुळे पालिका प्रशासन,लोकप्रतिनिधी व मुंबईतील या सर्व प्राधिकरणांनी समन्वय ठेवणे गरजेचे असून प्रभाग समितीच्या मासिक बैठकीला त्यांनी हजर राहिलेच पाहिजे, जेणेकरून मुंबईकरांच्या विविध समस्या लवकर सुटतील आणि त्यांचे जीवन सुसह्य होईल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. यासंदर्भात पी दक्षिण वॉर्ड च्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांनी या आरोपांचे खंडन करतांना सांगितले की,आपण व आपले अधिकारी हे पालिकेच्या नियमानुसार काम करतात.तसेच येथील नगरसेवकांशी सतत संपर्कात असून त्यांच्या कॉल व एसएमएसला देखिल उत्तरे देतात. आमचे सर्व अधिकारी येथील नगरसेवकांच्या व नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

Web Title: Meeting of P Ward Committee to protest against inaction of municipal officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.