Maharashtra Bandh : उद्या मुंबईसह उपनगर बंद, मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 17:38 IST2018-07-24T16:02:44+5:302018-07-24T17:38:52+5:30
Maharashtra Bandh मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने उद्या मुंबई बंदची हाक दिली आहे. हिंसा किंवा तोडफोड न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

Maharashtra Bandh : उद्या मुंबईसह उपनगर बंद, मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
मुंबई - मुंबईसह उपनगरात मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. उद्याचा बंद हा उत्स्फूर्त असेल. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये हा बंद पुकारण्यात आल्याचे मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी घोषणा केली आहे. कोणताही अनुचित प्रकार, हिंसा होणार नाही. तोडफोड न करण्याचे आवाहन यावेळी पवार यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काकासाहेब शिंदे सारखे मराठा क्रांती मोर्चाचे सैनिक बलिदान देत राहिले, तर संघटनेकडे फक्त गाजर राहतील. ज्याप्रकारे ठिय्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागत आहे. मूक मोर्चाचे ठोक मोर्चा करणारे सरकारच आहे.
हे शेवटचे शांत पद्धतीने होणारे आंदोलन आहे. यानंतर सरकारला मराठा क्रांती मोर्चाची धग पाहावी लागेल, असा इशारा नवी मुंबईच्या समन्वयकांनी आज दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
कसा असेल उद्याचा बंद :
बैठकीतील महत्वाचे मुद्दे -
- उद्याचा बंद हा उत्स्फूर्त असेल.
- ज्यांना सहानुभूती आहे, त्यांना बंदला प्रतिसाद द्या.
- कोणताही अनुचित प्रकार, हिंसा होणार नाही. तोडफोड न करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
- दहावी व बारावीची फेर परीक्षा असल्याने शाळा व महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आल्याचे सांगितले.
- मेगाभरती तत्काळ थांबवा आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी.
- खासगी वाहने मात्र रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे मराठा क्रांति मोर्चाने स्पष्ट केले आहे.
- शाळा व महाविद्यालयांना बंदमधून सूट देण्यावरून बैठकीत वाद निर्माण झाला.
- अत्यावश्यक सेवा, शाळांच्या बसेस, दूध गाड्या वगळत आहोत.
- मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रने काल बंदची घोषणा केली. वारकऱ्यांसाठी आज काही भागामध्ये संप पुकारला नाही.