"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 12:05 PM2024-03-10T12:05:56+5:302024-03-10T12:08:02+5:30

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Manoj Jarange's big announcement; Crores of Marathas will be united before the elections | "... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मुंबई/बीड - देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, राज्यात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा विराट सभा घेण्यात येत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे, ऐन निवडणुकांच्या प्रचारातातील धुराळ्यात मराठा आरक्षणाचाही धुराळा उडणार असल्याचे दिसून येते. बीडमधील गाठीभेटी दरम्यान जरांगेंनी जाहीर सभेची घोषणा केली. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी जरांगेंची आग्रही मागणी आहे. त्यावर, आपण ठाम असून लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील, असे जरांगे यांनी सांगितले. 

900 एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीची मागणी करणारी ही सभा असणार आहे. या सभेसाठी सध्या जागा शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांपूर्वी ही सभा होईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ''गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करुन दडपशाही सुरू केली आहे. त्यामुळे, मराठा समाजाला एकत्र यावं लागणार आहे. आम्ही ७०० एकर जागा पाहिली आहे, मात्र अजून ३०० एकर कमी पडते. त्यामुळे, आम्ही जागा पाहत असून लवकरच तारीखही सांगू. हे जर नाही थांबले तर आम्हाला शांततेत एकत्र यावे लागणार आहे आणि यांचं सगळं बिघडावं लागणार आहे,'' असा इशाराच जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 

राजकीय पक्ष कामाला, उमेदवारांची घोषणा

दरम्यान, पुढील आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी आघाडी व युतीतील जागावाटपाच्या अंतिम चर्चेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दोन उमदेवारांची घोषणाही करण्यात आली आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघासाठी अमोल किर्तीकर यांची तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, लवकरच जागावाटपाचा तिढा सुटला जाऊन महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे चित्र स्पष्ट होईल. 

Web Title: Manoj Jarange's big announcement; Crores of Marathas will be united before the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.