‘माणसाला मारता येते, मात्र त्यांचे विचार निरंतर राहतात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:42 AM2018-08-21T04:42:12+5:302018-08-21T04:42:33+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘जवाब दो’ अभियानांतर्गत वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमी अशी रॅली सोमवारी काढण्यात आली.

'Man can be killed, but his thoughts remain constant' | ‘माणसाला मारता येते, मात्र त्यांचे विचार निरंतर राहतात’

‘माणसाला मारता येते, मात्र त्यांचे विचार निरंतर राहतात’

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘जवाब दो’ अभियानांतर्गत वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमी अशी रॅली सोमवारी काढण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ५ वर्षे लोटली तरीही अजून खुनाचा तपास नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुन्यांना अटक कधी होणार, असा सवाल या वेळी करण्यात आला. ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ ‘माणसाला मारता येते, मात्र त्यांचे विचार निरंतर राहतात’, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. शिवाय शासनाचा धिक्कार, हिंसा के खिलाफ मानवता के ओर, अशा आशयाचे फलक हातात घेऊन रॅलीमध्ये नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र अंनिस, राष्ट्र सेवा दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आॅल इंडिया युथ फेडरेशन, एआयएसएफ, डेमोकॅ्रटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, मालवणी युवा परिषद, गुंज, आभा परिवर्तनवादी संघटना, जनता दल, मागासवर्गीय संघटना, संयुक्त महाराष्ट्र सेना, भारतीय महिला फेडरेशन, ज्येष्ठ नागरिक महासंघ, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, सदभावना संघ, प्रजासत्ताक संघटना व इतर अनेक समविचारी संघटना रॅलीत सहभागी झाल्या. या वेळी उपस्थित खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, वाढती हिंसा समाजाच्या ऐक्यासाठी धोकादायक आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कांगो यांनी हत्येच्या तपासाबाबत आणि शासनाच्या दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केली. तर २० आॅगस्ट हा दिवस यापुढे राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे देशातील २२ राज्यांतून कार्यरत विज्ञान क्षेत्रातील ४० प्रमुख संस्था संघटनांच्या सहभागाने स्थापन झालेल्या आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क व महाराष्ट्र अंनिसमार्फत ठरविण्यात आले. आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे डॉ. विवेक मोंटेरो, अंनिसच्या राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांचीही या वेळी भाषणे झाली. दरम्यान, सोशल मीडियावर #जवाब दो, #हू किल्ड दाभोलकर?, असे हॅशटॅग वापरून शासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. २० जुलैपासून ‘जवाब दो’ आंदोलन सुरू आहे.

Web Title: 'Man can be killed, but his thoughts remain constant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.