मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंंघात सर्वाधिक तृतीयपंथीयांची नोंदणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 02:53 AM2019-09-29T02:53:39+5:302019-09-29T02:54:20+5:30
समाजात सर्व अधिकारापासून वंचित राहिलेल्या तृतीयपंथीयांनी आता स्वत:च्या हक्कासाठी कंबर कसली आहे.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : समाजात सर्व अधिकारापासून वंचित राहिलेल्या तृतीयपंथीयांनी आता स्वत:च्या हक्कासाठी कंबर कसली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीत संपूर्ण शहरात सर्वाधिक निवडणुकीसाठी नोंदणी करणाºया तृतीयपंथीयांची संख्या मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक आहे. आपल्या हक्कासाठी लढण्याचे शस्त्र त्यांना मिळाले असून ही एक चांगली सुरुवात असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मालाड विधानसभेत २ लाख ९३ हजार ३९८ मतदार आहेत. यात १ लाख ५६ हजार ८३६ पुरुष, १ लाख ३६ हजार २५१ महिला तर २९२ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. संपूर्ण मुंबईच्या तुलनेने हा आकडा अधिक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करावी यासाठी साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी स्मिता मोहिते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी बरीच मेहनत घेतली. स्वत:च्या हक्कासाठी मतदानासारखे दुसरे धारदार शस्त्र नाही ही बाब समाजाच्या लक्षात येत असून त्यांनी मतदार यादीत स्वत:चे नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. अद्याप तृतीयपंथीयांची आकडेवारी तितकीशी समाधानकारक नव्हती. मालाडचा आदर्श घेत ही संख्या हळूहळू वाढेल, अशी आशा आहे.
अद्याप नोंदणी २९२ तृतीयपंथीयांची
‘मुंबई शहर आणि उपनगराची संख्या पाहता मालाडमधील तृतीयपंथीयांनी मतदानासाठी नावनोंदणी केली आहे. एकूण २९२ तृतीयपंथीयांनी नोंदणी केली असून, पुढेदेखील ही संख्या नक्कीच वाढेल, ही बाब खरेच स्वागतार्ह आहे.
- विजयसिंग पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, मालाड
‘वन विंडो अप्रोच’ची गरज
‘मालाडमधील आकडेवारी ही आपण एक सुरुवात म्हणू शकतो. जिकडे काहीच नव्हते तिथे काहीतरी होत आहे. मात्र ही आकडेवारी वाढण्यास येणारा खरा अडथळा म्हणजे कागदपत्रांचा अभाव. आमच्या समाजातील लोक मालाड, कामाठीपुरा किंवा मग धरावी या ठिकाणी भाडेतत्त्वावर झोपडीत राहतात. मतदानासाठी त्यांची कागदपत्रे तयार करण्यात अडथळा येतो. शासनाने ‘वन विंडो अप्रोच’ म्हणजे एकाच खिडकीवर आम्हाला आमची कागदपत्रे तयार करता येतील, अशी व्यवस्था करावी. जेणेकरून मतदार यादीत तृतीयपंथीयांची संख्यादेखील वाढीस लागून आम्हालाही हक्कासाठी लढता येईल.
- श्रीगौरी सावंत, संस्थापक, चारचौघी संस्था