'Mahilaraj' on social media | सोशल मीडियावरही ‘महिलाराज’
सोशल मीडियावरही ‘महिलाराज’

मुंबई  - जागतिक महिला दिनी बुधवारी फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छांचे उधाण आलेले दिसून आले. आपल्या आयुष्यातील ‘ती’चे फोटो आणि व्हीडीओ पोस्ट करून नेटीझन्सने स्त्रीशक्तीला सलाम केला. पूर्वी केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित राहिलेला हा दिन गुरुवारी मात्र शहर-उपनगरातील कार्यालये आणि महाविद्यालयांत आवर्जून साजरा केला गेला. त्यामुळे महिलावर्गातही आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.
माहीम येथील रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर उपस्थित होत्या. याप्रसंगी अभिनेत्री निशा परुळेकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन चेवले यांच्यासह इतर मान्यवर आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, आपण पाश्चात्त्य संस्कृतीचे दिन साजरे करतो; परंतु त्यातून सकारात्मक गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण आपल्या भाषेची आणि संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. त्याचबरोबर महिलांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृत राहून याबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले.
या वेळी डॉ. संदीप बिप्टे यांनी महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाअंतर्गत दुर्गा महिला मंचच्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अमृता देवेंद्र फडणवीस, पद्मश्री कल्पना सरोज यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुंग फू मार्शल आटर््स आणि स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे महिलांसाठी ‘सेल्फ डिफेन्स कुंग फु आटर््स’ची कार्यशाळा घेण्यात आली. खाररोड येथील संबोधी बुद्ध विहार आणि वांद्रे येथील थाडोमल शहानी इंजिनीअर महाविद्यालयातील मुलींना या वर्कशॉपमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या वेळी संबोधी बुद्ध विहार आणि इंजिनीअर महाविद्यालयातील एकूण १०० ते १२० मुली सहभागी झाल्या.
त्याचप्रमाणे, जेट एअरवेजतर्फेही महिला दिनाच्या निमित्ताने मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद, दिल्ली-बंगळुरू, मुंबई-बंगळुरू या फ्लाइट्समध्येही केवळ महिला वैमानिकांसह महिलाच सहकारी होत्या. त्यामुळे प्रवाशांनी त्या सर्वांना शुभेच्छा देऊन महिला दिन साजरा केला. तर भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्या वतीने डोंगरी येथील बालसुधारगृहात सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण करण्यात आले.
पुढील सहा महिने हा उपक्रम राबविण्यात येणार असून या संस्थेच्या वतीने विनामूल्य पद्धतीने
सॅनिटरी पॅड देण्यात येतील. याशिवाय, मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील रेल्वे स्थानकावरही शायना एन. सी. यांच्यातर्फे सॅनिटरी पॅड्सचे संचलन करणारे यंत्र देण्यात आले.
 


Web Title:  'Mahilaraj' on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.