...हे टाळता आलं नसतं का? श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंचा खरमरीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:20 PM2023-04-17T12:20:43+5:302023-04-17T12:22:08+5:30

Maharashtra Bhushan Award Ceremony: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सोहळ्याला लागलेल्या गालबोटावरून प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. 

Maharashtra Bhushan Award Ceremony: ...Couldn't this have been avoided? Raj Thackeray's hard question while paying tribute to Shri Sadasya | ...हे टाळता आलं नसतं का? श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंचा खरमरीत सवाल

...हे टाळता आलं नसतं का? श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंचा खरमरीत सवाल

googlenewsNext

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल एका भव्यदिव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळ्यादरम्यान, तीव्र उन्हात जमलेल्या लाखो श्री सदस्यांपैकी ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण आजारी पडले आहेत. या घटनेनंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर टीका होत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सोहळ्याला लागलेल्या गालबोटावरून प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. 

राज ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी  श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन भोवळ आल्याच्या घटना घडल्या. त्यात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी राज्यभरातून लाखो लोक खारघर येथे आले होते. दुपारी दीड दोन वाजेपर्यंत हे लोक मैदानात होते. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने यातील अनेकांना त्रास झाला होता. 

Web Title: Maharashtra Bhushan Award Ceremony: ...Couldn't this have been avoided? Raj Thackeray's hard question while paying tribute to Shri Sadasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.