"महादेव जानकर परभणीचे नाहीत"; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:01 PM2024-04-01T19:01:19+5:302024-04-01T19:03:16+5:30

परभणीत महायुतीकडून महादेव जानकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

"Mahadev Jankar is not from Parbhani"; Rasp chief's 'hey' answer to opposition propaganda of shivsena | "महादेव जानकर परभणीचे नाहीत"; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

"महादेव जानकर परभणीचे नाहीत"; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांमधील उमेदवाराचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मराठावाड्यातून राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी अर्ज दाखल केला. महादेव जानकर यांना परभणीतून महायुतीच्या नेतृत्वात उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील ही जागा महादेव जानकर यांना सोडली असून रासपच्या चिन्हावर ते येथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, महादेव जानकर हे परभणीचे भूमिपुत्र किंवा रहिवाशी नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून होत आहे. त्यावर, आता जानकरांनी उत्तर दिलं.  

परभणीत महायुतीकडून महादेव जानकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना खासदार संजय बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकासोबत जानकरांची लढाई असणार आहे. त्यातच, उमेदवारीची घोषणा झाल्यापासून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात करण्यात आली. मात्र, महादेव जानकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या पळसावडेचे आहेत. त्यामुळे, परभणी जिल्ह्याशी त्यांचा तसा संबंध केवळ पक्षीय राजकारण आणि समाज बांधवांशी जवळीक इतकाच आहे. त्यामुळे, महादेव जानकरांना परभणीतून उमेदवारी दिल्यानंतर विरोधक त्यांच्या स्थानिक नसण्याच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. त्यावर, आता जानकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज परभणीतून उमदेवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, या प्रश्नावर उत्तर दिलं. 

एकच दिवस मला मिळाला, आज शक्तीप्रदर्शन वगैरे काही नाही. शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम पुन्हा घेऊ, असे म्हणत जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, महादेव जानकर हे परभणीचे नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय, त्यांना काय उत्तर द्याल, असा सवाल जानकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी माझ्या विकासाच्या कामातून त्यांना उत्तर देईल, कुावरही टीका टीपण्णी करणार नाही. परभणीचा विकास हेच माझं ध्येय असल्याने लोकांना उत्तर मिळेल, असे जानकरांनी म्हटले. तसेच, स्थानिक नेत्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, सर्वकाही पॅच अप झालेलं आहे. महायुतीचे सर्वच नेते म्हणजे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही नेते माझा प्रचार करतील, असेही जानकर यांनी सांगितले.  

पंकजा मुंडेंनीही विरोधकांना सुनावलं

पंकजा मुंडेंनी भाऊ महादेव जानकर यांची बाजू घेत विरोधकांचा समाचार घेतला. महादेव जानकर हे बाहेरून आलेले उपरे उमेदवार आहेत. या विरोधकांच्या टीकेला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. महादेव जानकर हे एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य माणसाच्या विकासासाठी त्यांनी घर सोडलं आहे, ते अविवाहित आहेत. कुटुंबीयांसाठी चार पैसे कमवायची त्यांना आवश्यकता नाही. त्यांच्यावर बाहेरून आल्याचा आरोप होत असेल तर तो बरोबर नाही. राज्याच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसासाठी भटक्या-विमुक्तांसाठी काम करणारा माणूस हा भटकतच असतो. तुमच्या विकासासाठी बारामतीमध्ये (Baramati) सुरू झालेला त्यांचा प्रवास भटकत भटकत परभणीत (Parbhani) येऊन थांबलेला आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मंचावरच्या माणसांची आहे तेवढीच तुमची आहे, असं मुंडे म्हणाल्या.
 

Web Title: "Mahadev Jankar is not from Parbhani"; Rasp chief's 'hey' answer to opposition propaganda of shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.