वेसावे कोळीवाड्यातील माघी पौर्णिमा उत्सवाची शानच काही और...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:06 PM2018-01-31T12:06:52+5:302018-01-31T12:11:28+5:30

माघ पोर्णिमा म्हणजे जेजुरीच्या खंडोबाची पत्नी म्हाळसा देवी हिचा जन्म दिवस. तसेच खंडोबा म्हाळसेचा विवाह पौष महिन्यात झाल्यानंतर, माघ पोर्णिमेला कुलस्वामी खंडेरायाची अगदी वाजत गाजत थाटात वर्हाड काढण्याची पुरातन परंपरा मुंबई व रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांमध्ये आहे.

Maghi Purnima in Vesave Koliwada | वेसावे कोळीवाड्यातील माघी पौर्णिमा उत्सवाची शानच काही और...

वेसावे कोळीवाड्यातील माघी पौर्णिमा उत्सवाची शानच काही और...

Next

मनोहर कुंभेजकर
मुंबई - माघ पोर्णिमा म्हणजे जेजुरीच्या खंडोबाची पत्नी म्हाळसा देवी हिचा जन्म दिवस. तसेच खंडोबा म्हाळसेचा विवाह पौष महिन्यात झाल्यानंतर, माघ पोर्णिमेला कुलस्वामी खंडेरायाची अगदी वाजत गाजत थाटात वर्हाड काढण्याची पुरातन परंपरा मुंबई व रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांमध्ये आहे. मुंबईतील वेसावे, खार दांडा, धारावी, कुलाबा, वरळी तसेच रायगड जिल्ह्यामधील अलिबाग, रेवस, रेवदंडा, मुरूड जंजिरा, वरसोली, नवगाव ईत्यादी कोळीवाड्यातील खंडोबा भगत मंडळी आपले पोवे (कोळ्यांचे भक्त मंडळ) व सजवलेल्या देवाच्या पालख्या घेऊन ३ वर्षात एकदा देव भेटीसाठी जेजुरीत दाखल होत असतात. तसेच आपल्या कोळीवाड्यात देखील पालख्या मिरवून खंडोबाची वऱ्हाड काढली जाते. 

केरळनंतर मासेमारीत वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.आजही कॉक्रीटच्या जमान्यात मुंबईचे मूळ नागरिक असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे.वेसावे गावातील पालख्यांचा थाट काही औरच असतो. त्यांची सजावट आणि मिरवणुक अगदी मनमोहक वाटते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माघ पोर्णिमेचे औचीत्य साधून काल रात्रौ ९:३० च्या सुमारास वेसावे गावातील प्रमुख ८ खंडोबा पोवा भगत मंडळी आपल्या सुंदर पालख्यांसमवेत मल्हारी मार्तंडाच्या वऱ्हाडाला सज्ज झाले होते.गोमा भगत, पाटील भगत, झेमने भगत, लखडी भगत,वाघ्या मुरळी, बुधा भगत, पिकले इत्यादी वेसावे गावातील खंडोबा पोवा भगत मंडळी आपल्या पालख्या घेऊन वेसावे गावाच्या वेशीवर तेलवण वाडीत (देवाची वाडी) दाखल झाले होते.काल रात्री १०:३० नंतर पोर्णिमा प्रारंभ झाल्यावर पालखीची पारंपारीक पद्धतीने येळकोट गजरात भंडारा उधळीत पूजा करण्यात आली.कोळी बांधव व भगिनी बँड बाजाच्या ठेक्यावर नाचत व खंडोबाच्या लग्नाची पारंपारीक गाणी म्हणत कोळी महिलांनी खंडोबा देवाच्या लग्नाचा आनंद व्यक्त केला तसेच "सदानंदाचा येळकोटाच्या " जयघोशात पालख्या तेलवण वाडीच्या दिशेने प्रस्थान झाल्या होत्या अशी माहिती येथील एमबीएचा विद्यार्थी मोहित रामले यांनी दिली.

नवल म्हणजे वेसावे गावात माघ पोर्णिमेला देवाच्या अंगावर हळद-भंडार खोबरं उढळुन मग नंतरच गावातील मुला मुलींच्या लग्न सोहळ्याची तयारी केलीे जाते.या जुन्या रिवाजाला वेसावकर शुभ शकुन मानतात.वेसाव्यातील गोमा भगत मंडळीत तर अगदी अलिबाग, रेवस, वरसोली येथील काही कुल-घराणी सदस्य आहेत. तसेच बुधा भगताच्या पोवा मंडळात मुंबईतील खार दांडा तर झेमने भगत व वाघ्या मुरळी मंडळात मढ, मालवणी, पाटवाडी येथील कुल-घराण्यांचा देखील सहभाग असतो. झेमने भगत मंडळात तर जवळ जवळ १८-२० कुल-घराणी सदस्य आहेत. त्यांच्या पालखीत या सर्व सदस्यांच्या देव घरातील खंडोबा, भवानी व बैरी देवाचे वजनदार चांदीचे टाक बसवले जातात. मग पारंपारीक पुजे नंतर खरी कसरत असते ती वजनदार पालखी उचलण्याची  वेसाव्याची परंपरा आहे.डोंगरी गल्लीतील लडगे, टपके, रामले, भोगे, शेंडे, डोंगरीकर, बिच्चु, जांगले, खादु, बांडुक कुटुंबातील तरुण पिढी पालखी उचलुन गावात मिरवण्याची महत्वाची बाब पार पाडते. वेसाव्यातील पाटील भगत मंडाळातील आणखी एक जुनी परंपरा म्हणजे देवघरात खंडोबाची पत्नी महाळसा देवीची घट स्थापना केलेली असते अशी माहिती मोहित रामले यांनी शेवटी दिली.

Web Title: Maghi Purnima in Vesave Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.