वेडाच्या भरात केलेला दुसरा खूनही झाला माफ!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 02:37 AM2018-07-08T02:37:50+5:302018-07-08T02:40:35+5:30

मोहम्मद रफीक शहाबुद्दीन शेख या चंद्रेश महाल, नयानगर, मिरारोड (पू.) येथे राहणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाने देवेंद्र थापा या सोसायटीच्या वॉचमनचा खून वेडाच्या भरात केला होता, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्त केली आहे.

A madness filled with madness has also been forgiven! | वेडाच्या भरात केलेला दुसरा खूनही झाला माफ!  

वेडाच्या भरात केलेला दुसरा खूनही झाला माफ!  

Next

मुंबई : मोहम्मद रफीक शहाबुद्दीन शेख या चंद्रेश महाल, नयानगर, मिरारोड (पू.) येथे राहणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाने देवेंद्र थापा या सोसायटीच्या वॉचमनचा खून वेडाच्या भरात केला होता, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्त केली आहे.
आपल्या घरच्या झाडांना सांगूनही पाणी घातले नाही म्हणून शेख याने थापाचा ८ नोव्हेंबर २००७ रोजी चाकूने भोसकून खून केला होता. ठाणे सत्र न्यायालयात खटला चालला तेव्हा शेखच्या वकिलाने हा खून वेडाच्या भरात केला गेल्याचा बचावाचा मुद्दा घेतला होता व त्यामुळे भादंवि कलम ८४ च्या आधारे त्याला सोडून द्यावे, असा युक्तवाद केला होता. परंतु ते अमान्य करताना सत्र न्यायाधीशांनी म्हटले होते की, जेव्हा खून केला तेव्हा आरोपी आपण काय करत आहोत हे समजण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता हे जरी मान्य केले तरी खटला सुरु असताना किंवा शेवटी आरोपीचा जबाब नोंदवितानाही शेख याने असे काहीही सांगितले नाही.
सत्र न्यायालयाने शेख याला सन २०१३ मध्ये जन्मठेप ठोठावली होती व तेव्हापासून तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात होता. त्याच्या अपिलावर न्या. भूषण गवई व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा शेखचे वकील अ‍ॅड. शेखर इंगवले यांनी थापाचा खून शेखनेच केला हे मान्य केले. मात्र कलम ८४ चा बचाव सत्र न्यायालयाने अमान्य केला हे चुकीचे आहे, एवढाच मुद्दा मांडला. खंडपीठाने सर्व रेकॉर्ड पाहिले व हा बचाव मान्य करून शेख याची निर्दोष मु्क्तता केली. शेख याने वेडाच्या भरात केलेला हा दुसरा खून कलम ८४ अन्वये माफ झाला आहे. शेख याच्यावर मंजित मगक कवेटिया याचा खून केल्याचा खटला चालला होता. त्यावेळी खून शेख यानेच केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होऊनही सत्र न्यायालयाने तो खून वेडाच्या भरात केला गेल्याचा निष्कर्ष काढून शेखला निर्दोष सोडले होते.

काय आहे कलम ८४?
गुन्हेगार प्रत्येक गुन्हा समजून-उमजून करत असतो, असे गृहित धरले जाते. मात्र भादंवि कलम ८४ ने याला अपवाद केला आहे. आपण काय करत आहोत हे समजण्याच्या मानसिक स्थितीत नसताना केलेले कृत्य गुन्हा ठरत नाही, असे हे कलम सांगते. आपण वेडाच्या भरात गु्न्हा केला हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असते. मात्र अभियोग पक्षास जसा आरोपीवरील गुन्हा नि:संशय पुराव़्यांनी सिद्ध करावा लागतो तसे कलम ८४ च्या बाबतीत आरोपीचे नाही. त्याने गुन्ह्याच्या वेळी आपली मानसिक स्थिती ठीक नव्हती याची प्रबळ शक्यता दाखविली तरी पुरेसे ठरते.

१२ वर्षांनी झाला खून माफ
गेल्या आठवडयात सर्वोच्च न्यायालयाने अमरावती जिल्ह्यातील अजनी खुर्द, बारशी टाकळी येथील देवीदास लोका राठोड या आरोपीने १२ वर्षांपूर्वी केलेला खून वेडाच्या भरात केला होता, असा निष्कर्ष काढून त्याची निर्दोष मुक्तता केली होती. देवीदासने हरिश्चंद्र चव्हाण याचा २६ सप्टेंबर २००६ रोजी विळयाचे वार करून खून केला होता. सत्र न्यायालयाने त्याचा कलम ८४ चा बचाव अमान्य करून त्याला जन्मठेप दिली होती व उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते.

Web Title: A madness filled with madness has also been forgiven!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.