ठळक मुद्देथोडंसं शहरापासून वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही इकडे केव्हाही भेट देऊ शकता.  लहान मुलांसाठी इकडे खेळण्याची साधनंही आहेत त्यामुळे तुम्ही हवी तशी मस्ती करू शकता.लेक्चर्सचा वैताग आला की कॉलेजची मुलं याठिकाणी उड्या घेतात.

मुंबई : महागडी हॉटेल्स, कॅफे, पब, थिएटर्स अशा ठिकाणी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपण जातो. सगळा पॉकेटमनी एकाचदिवशी खर्च करतो. पण मनाचं समाधान काही तिकडे मिळत नाही? प्रत्येकवेळेला ए‌वढे पैसे खर्च करणं सर्वांना शक्य होत नाही. कॉलेज बंक्स करून कधीतरी पिक्चर मारला जातो, किंवा कोणत्यातरी कॉफी शॉपमध्ये मजा-मस्ती केली जाते. पण ही मस्ती मुंबईतच फुकटात करायला मिळाली तर? मुंबईत अशी कितीतरी ठिकाणं आहेत, जिथे आपण एकही रुपया खर्च न करता मनासारखी मौजमस्ती करायला मिळेल. मुंबईतली अशीच काही ठिकाणं आपण आज पाहुया.

कुलाबा कॉजवे

शॉपिंग करणाऱ्यांना कुलाबा कॉजवेविषयी नवं काही सांगायला नको. मात्र हा विभाग फोटोग्राफर्ससाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. थोडासा वर्दळीचा रस्ता असला तरी इकडे फोटोग्राफर्स नेहमीच येत असतात.

मरिन ड्राईव्ह

दक्षिण मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांचा सगळ्यात आवडता कट्टा म्हणजे मरिन ड्राईव्ह. लेक्चर्स बंक करून इकडे फक्त कॉलेजचेच तरुण येतात असं नाही, नेहमीच्या दगदगीचा वैतागलेला प्रत्येक मुंबईकर स्वत:ला रिफ्रेश करायला इकडे येतोच. संध्याकाळी इकडे एक वेगळाच उत्साह असतो. असा उत्साह कधीच विकत घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे मरिन ड्राईव्ह विषयी प्रत्येक मुंबईकरांच्या मनात एक वगेळं स्थान निश्चितच आहे.

गिरगाव चौपाटी

मरिन ड्राईव्हच्याच बाजूला असलेली गिरगाव चौपाटी म्हणजे अनेक प्रेमीयुगुलांची हक्काची जागा. इकडचा सूर्यास्त बघण्यासाठी कित्येकांची बरोबर ६ च्या ठोक्याला इकडे हजेरी लागते. वाळूमध्ये खेळण्यासाठीही अनेक बच्चेकंपनी येत असतात.

हँगिग गार्डन

गिरगाव चौपाटीच्या समोरच्याच गल्लीत असणारा हँगिग गार्डन उंचावर असणाऱ्या गार्डनपैकी एक. ही बाग सुंदररित्या सुशोभीकरण केलं असल्याने मुंबईकरांचा ओघ इकडे वाढतच असतो. गिरगाव चौपाटीपासून जवळच असल्याने काही कुटूंब इकडेही आवर्जुन भेट देतात.

कमला नेहरु पार्क

हँगिग गार्डनच्या अगदीच बाजूला असेलेला कमला नेहरु पार्क म्हातारीच्या बुटामुळे फार प्रसिद्ध आहे. आजही तिकडे म्हातारीचा हा भलामोठा बुट इकडे आहे. त्यामुळे बच्चेकंपनीसोबतच अनेक यंगस्टर्सही इकडे आवर्जुन येतात. धमाल, मजा-मस्ती करण्यासाठी हे गार्डन एकदम बेस्टच.

वरळी सी-फेस

वरळी सी-फेसवरही तुम्ही एक रुपयाही खर्च न करता आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात भुरभुरीत भाजणाऱ्या मक्यासोबत इकडच्या समुद्राच्या लाटांचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच. ही मजा कोणत्याही कॉफी शॉप किंवा पबमध्ये पैशांमध्ये विकतही घेता येणार नाही.

शिवाजी पार्क

दादरकरांचा शिवाजी पार्क म्हणजे हक्काचा कट्टा. नेहमीचं भेटण्याचं ठिकाण. आपण कसे सहज म्हणून जवळच्या नाक्यावर जाऊन येतो, तसंच दादरकर पाय मोकळे करायला शिवाजी पार्कात येतात. क्रिकेट प्रेमींसाठी तर शिवाजी पार्क हे मंदिरापेक्षा काही कमी नाही. सचिन तेंडूलकरने स्वत:ला याच मैदानात घडवलं म्हणून अनेक क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू इकडे येतच असतात. 

दादर चौपाटी

शिवाजी पार्कच्या थोडं पुढे गेलात की दादर चौपाटी. या चौपाटीला प्रभादेवी बीचही म्हणतात. दादर चौपाटीवर उभारलेला वांद्रे-वरळी सीलिंकचा नजारा इथून अप्रतिम दिसतो. प्रेमीयुगुलं इकडे सायंकाळची फार गर्दी करतात. त्याचप्रमाणे स्थानिक रहिवासी इव्हिनिंग वॉकसाठीही इकडे येतात. 

बॅण्डस्टँड

या परिसरातही अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे लेक्चर्सचा वैताग आला की कॉलेजची मुलं थेट बॅण्डस्टँडला उडी घेतात. बँण्डस्टँड हे मन्नत या बंगल्यासाठीही प्रसिद्ध आहे. शाहरुख खानच्या एका झलकसाठी त्याचे फॅन त्याच्या बंगल्याबाहेरच उभे असतात. तसंच सलमान खानचं ‘गॅलॅक्सी अपार्टमेंट’ही तिथेच असल्याने त्याचे फॅन्सही तिथे गर्दी करून उभे असतात.

जुहू बीच

मुंबई उपनगरात असलेला सगळ्यात सुंदर बीच म्हणजे जुहू बीच. इकडे तुम्ही पतंग, फुगे उडवण्याचाही आनंद घेऊ शकता. त्यामुळे थोड्यावेळासाठी तरी तुम्ही तुमच्या बालपणात रमता. इकडचं वातावरणही अगदी शांत असल्याने मनसुद्धा प्रसन्न होतं.

वर्सोवा बीच

वर्सोवा किनारी समुद्राच्या लाटा झेलत मित्रांसोबत मस्ती करण्याची मजा काही औरच. कित्येक तरुण इकडे मोबाईलवर गाणी लावत धिंगाणा घालतानाही दिसतात. त्यामुळे तरुणांसाठी फुल्ल ऑन एन्जॉय करण्यासाठी वर्सोवा हा सगळ्यात चांगला बीच आहे.

माझगाव डोंगर

डॉकयार्ड स्थानकाजवळ असलेलं माझगावच्या डोंगरावर मस्त बाग आहे. यालाच जोसेफ बाप्टिस्टा गार्डन असं नाव आहे. विविध झाडांनी वेढलेल्या या उंच डोंगरावर तुम्ही तुम्हाला हवी तशी मस्ती करू शकता. लहान मुलांसाठी इकडे खेळण्याची साधनंही आहेत. हे डोंगर उंचावर असल्याने तिकडून भाऊचा धक्का अगदी स्पष्ट दिसतो. 

पवई तलाव

ब्रिटिशांनी १७९९ साली बांधलेला तलाव आजही पवईत आहे. या तलावाचं उत्तम सुशोभीकरणही करण्यात आलं आहे. जॉगिंग ट्रॅक, म्युझिकल फाऊंटन आणि मुलांसाठी खेळण्यासाठीही इकडे जागा आहे. त्यामुळे  थोडंसं शहरापासून वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही इकडे केव्हाही भेट देऊ शकता. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.