इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:41 AM2019-02-28T01:41:07+5:302019-02-28T01:41:16+5:30

द्वारकानाथ संझगिरी : महापालिकेत ‘मराठी भाषा पंधरवडा’ कार्यक्रम पार पडला

Let other speakers also speak Marathi | इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा

इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचे धोरण इतर राज्यांमध्ये अवलंबिले जाते. मराठी माणसामध्येही मोठी ताकद असून त्या ताकदीचा वापर करून इतर भाषिकांना मराठीत बोलायला लावावे़ असे झाले तरच मराठी भाषा दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही, असे मत प्रसिद्ध लेखक, पत्रकार व क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी आज व्यक्त केले.


मुंबई महापालिका सभागृहात ‘मराठी भाषा पंधरवडा’चा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून संझगिरी बोलत होते. यावेळी उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, अतिरिक्त पालिका आयुक्त आबासाहेब जºहाड आदी मान्यवर उपस्थित होते. आपण दुसऱ्याबरोबर संभाषण हिंदीमध्ये केल्यास आपल्यासोबत मराठीत कोण संभाषण करेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक हा बहुमान दादासाहेब फाळके यांना दिला जातो. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात, संगीत क्षेत्रात दुर्गा खोटे, वसंत देसाई, लता मंगेशकर या मराठी कलाकारांची चांगली दादागिरी होती. क्रिकेट खेळात पाळवनकर बंधू, गावस्कर, पी.बाळू, चंदू बोर्डे, वेंगसरकर, वाडेकर, सचिन तेंडुलकर, अशा दिग्गज मराठी खेळाडूंनी चांगली दादागिरी करून देश- विदेशातील मैदाने गाजवली याचे सांझगिरी यांनी स्मरण करून दिले.

मराठी ग्रंथालय हवे...
जर्मनी स्टुटगार्ड येथे आठ मजल्याच्या ग्रंथालयात त्याच भाषेची पुस्तके होती. महापालिकेच्या अनेक इमारती ओस पडल्या आहेत. त्यात मराठी ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. मुंबईमधील अमेरिकी दूतावासामध्ये हिंदी आणि गुजराती फलक लावले आहेत. त्या ठिकाणी मराठीत फलक नाही. पालिकेने पाठपुरावा करून तेथे मराठीत फलक लावून घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठीतून बेस्ट कारभार
बेस्ट उपक्रमातही सर्व कामकाज मराठीतून व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. महापालिकेतील कारभार शंभर टक्के मराठीतून चालविला जातो. त्याप्रमाणे बेस्टचा कारभारही मराठीतून चालविण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी आज केली.

विमानतळाला मराठी भाषा दिनाचे विस्मरण
मराठी भाषा दिन राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र याबाबत कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नसल्याने विमानतळ प्रशासनाला मराठी भाषा दिनाचे विस्मरण झाल्याची चर्चा होत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत असलेल्या या विमानतळावर मराठी भाषा दिनानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title: Let other speakers also speak Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.