गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 05:39 PM2018-11-27T17:39:18+5:302018-11-27T17:39:30+5:30

गेले २२ वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी आहे.

For the last 22 years I have been fighting for Maratha reservation, BJP's stomach - Dhananjay Munde | गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे

गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे

Next

मुंबई- "गेले २२ वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करतंय, असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात आजही धनंजय मुंडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला जेरीस आणले. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्यास विरोधी पक्षांनी आजही आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे दोनदा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर जेव्हा सभागृह सुरू झाले तेव्हा भाजपाचे सभागृहातील नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'धनंजय मुंडे आणि इतरांविरुध्द आरक्षण विरोधी आरोप केला.

दरम्यान विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. "गेल्या २२ वर्षांपूर्वी मी बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना प्रथम मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि हा मुद्दा आजतागायत लावून धरला आहे; हे सकल मराठा समाजाला ज्ञात आहे. विधान परिषदेतदेखील गेल्या चार वर्षांत शेतकरी कर्जमाफी, मराठा-लिंगायत-धनगर-मुस्लिम आरक्षणाबाबत मी सातत्याने मुद्दे लावून धरलले आहेत. भारतीय जनता पक्षाला मी ओबीसी असल्याने मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय हे देखवत नाहीये म्हणून ते माझ्या विरोधात घोषणा देत आहेत. संघाच्या विचारधारेवर चालणार हे फसवं सरकार जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करतंय," असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान "संविधानाच्या कलम ३४० अंतर्गत गठीत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात पटलावर ठेवण्यास सरकार बांधील आहे. तो संपूर्ण नियम मी सभागृहात वाचून दाखवला. नियमासकट मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्यामुळे सरकारची अडचण झाली आहे म्हणून स्वतःच पाप झाकण्यासाठी मी मराठा आरक्षणाला विरोध करतोय, असे म्हणत हे फसवं सरकार माझी बदनामी करत आहे. उलटपक्षी मी मराठा आरक्षणप्रश्नी हजारो किलोमीटर पायी चालून संघर्ष करून संवैधानिक मार्गाने लढणारा कार्यकर्ता आहे याची जाणीव राज्यातील जनतेला आहे हे सरकारला माहिती असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने सत्ताधारी बेताल आरोप करत आहेत." असे धनंजय मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Web Title: For the last 22 years I have been fighting for Maratha reservation, BJP's stomach - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.