लडका, लडकी है क्या?; दोन ते पाच लाखांत होत होता चिमुकल्यांचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 09:02 AM2023-11-25T09:02:32+5:302023-11-25T09:03:05+5:30

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पाच जणांना अटक

Ladka, Ladki Hai Kya?; Babies were being traded for two to five lakhs in mumbai | लडका, लडकी है क्या?; दोन ते पाच लाखांत होत होता चिमुकल्यांचा सौदा

लडका, लडकी है क्या?; दोन ते पाच लाखांत होत होता चिमुकल्यांचा सौदा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : बाजारात एखादी नवीन वस्तू आली की उत्सुकतेपोटी तिची खरेदी-विक्री जशी होते तशीच मुला-मुलींची ‘लडका, लडकी है क्या, कितने साल का है’ असे विचारत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरीब कुटुंबातील लहान मुले हेरून त्यांची विक्री करत लाखो रुपये ऐषोरामावर उधळणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून चक्क एक महिलाच या सर्व प्रकरणाची सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. 

नशेसाठी पोटच्या दोन मुलांची विक्री करणाऱ्या शब्बीर आणि सानिया या खान दाम्पत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीतून शकील मकराणीला अटक केली; तर त्याच्या चौकशीतून वैशाली फगरिया ऊर्फ वैशाली जैन (४५) या महिलेची माहिती मिळाली. ही महिला लहान मुलांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील सचिन पुराणिक, दीपक पवार, उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, नरेंद्र पालकर यांनी धडक कारवाई करत एक मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीने आतापर्यंत आठ मुले मुंबईसह पालघर, आंध्र प्रदेश, आणि तमिळनाडूमध्ये विक्री केल्याचे उघड झाले आहे. 

मेहुणीच्या मुलाचीही विक्री
n बाळकृष्ण कांबळे गार्बेज मोटर लोडिंगचे काम करतो. 
n त्याने स्वतःच्या दोन मुलांसह मेहुणीच्या आणि अन्य एक अशा दोन मुलांची विक्री केली आहे. 
n चौथे मूल कोणाचे आहे, याची चौकशी गुन्हे शाखा करत आहे. 

गृहिणी निघाली मास्टरमाइंड
भायखळा परिसरात राहणारी वैशाली जैन ही गृहिणी असून ती शफिकच्या मदतीने हे रॅकेट चालवत होती. याबाबत तिच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

शेकडो मुलांची विक्री? 
या टोळीने आतापर्यंत दोन ते पाच लाखांत शेकडो मुलांची खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत गुन्हे शाखा कसून चौकशी करत आहे. या टोळीची पाळेमुळे विविध राज्यांत पसरली आहे. 

गरीब कुटुंबे टार्गेटवर 
झोपडपट्टीच्या वस्तीसह गरजू कुटुंबे हेरून ही मंडळी हे रॅकेट चालवत होती. पैशांचे आमिष तसेच, मुलांच्या चांगल्या भवितव्याची स्वप्ने कुटुंबाना दाखवत हा व्यवहार सुरू होता. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

चिमुकलीची सुटका
वैशाली जैन हिच्या ताब्यातून पोलिसांनी एका चिमुकलीची सुटका केली. वैशालीने ही मुलगी ठाण्यातील रिक्षाचालक शफीक हारून शेख ऊर्फ साहिल (४५) आणि पालघरला राहणाऱ्या बाळकृष्ण कांबळे (३३) यांच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. ती मुलगी कांबळेचीच आहे. त्यापाठोपाठ या गुन्ह्यात सहभागी असलेल्या  अंधेरीतील उषा राठोड (४२), डोंगरीतील मणिकम्मा नरसप्पा भंडारी ऊर्फ अम्मा (६३) या दोघींना बेड्या ठोकल्या. अम्मा इस्टेट एजंट म्हणून काम करते. 

Web Title: Ladka, Ladki Hai Kya?; Babies were being traded for two to five lakhs in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.