दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर कोकणची फुंकर

By admin | Published: November 30, 2015 09:39 PM2015-11-30T21:39:36+5:302015-12-01T00:22:26+5:30

नामा संस्थेचा पुढाकार : कोकण आणि गोव्याच्या पर्यटन व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध

Konkan swelling on the saddle of drought | दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर कोकणची फुंकर

दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर कोकणची फुंकर

Next

शिवाजी गोरे--दापोली--मराठवाड्यामध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत, काही भागात पेरण्या झाल्या. परंतु पावसाअभावी पेरलेले बियाणे करपून गेले. त्यामुळे जीवन जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न मराठवाड्यात निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीत काही उगवलच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जगायचे कसे? तरुणांच्या हाताला रोजगार नाही, जनावरांना चारा नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा दाहक वास्तवतेतून जाणाऱ्या मराठवाड्याच्या दु:खावर आता कोकणाने फुंकर घातली आहे. मराठवाड्यातील तरूणांसाठी रोजगार देण्यात कोकणातील व्यावसायिकांनी पुढचे पाऊल उचलले असून, त्यात नामा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील दाहकता वाढू लागली असून, दुष्काळग्रस्त शेतकरी काळवंडला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाप्रमाणेच जनावरांना जगवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण यासाठी पैसा आणायचा कुठून, असा गंभीर प्रश्न आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्याने बँकांनी कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरू असून, शेतकऱ्यानी आत्महत्या करू नयेत.
यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी पॅकेजसुद्धा जाहीर केले आहे. परंतु सरकारच्या तुटपुंजा मदतीवर या शेतकऱ्याचे पोट भरणे शक्य नाही. पाऊसच पडला नाही, त्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. पावसाअभावी पेरण्या केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर या दोन्ही घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुकी जनावरे जगवायची कशी? चारा नाही, पाणी नाही, अशा वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हे गंभीर वास्तव मराठवाड्यात सुरू आहे.रिकाम्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी नामा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अभिनेते मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी पुढकार घेतला असून, मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांना कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिकाकडे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोकण व गोव्यात पर्यटन व्यवसाय वाढीबरोबरच कामगारांची उणीव भासू लागली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांना मजुरांची भासत असलेली उणीव दूर करण्यासाठी व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी नामा संस्थेचे डॉ. अविनाश पोळ यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे काम लातूरचे डॉ. राऊत करीत असून, त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुण कोकणात दाखल होत आहेत.
कोकण, गोवा या भागातील पर्यटन व्यवसायातून हजारो दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळायला सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे कोकणातील पर्यटन जिल्हे आहेत. या तीनही जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी आहे. परंतु पर्यटन व्यावसायिकांसमोर सर्वांत मोठी समस्या आहे ती कामगारांची! हॉटेल व्यवसायाकरिता कामगार मिळेनासा झाल्याने अनेक हॉटेल मालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या आता दूर होणार आहे.
कोकणाप्रमाणेच गोव्यातील पर्यटन व्यवसायाकरिता मजुरांची गरज असल्याचे लक्षात आल्याने कोकण व गोव्यातील पर्यटन व्यवसायाकरिता मराठवाड्यातील हजारो तरुण पाठवण्यात येत आहेत.
कोकणातील पर्यटन व्यवसायाकरिता मजुरांची गरज भासल्यास नामा संस्था, सुवर्णदुर्ग संस्थेचे अध्यक्ष शैलेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिश पटवर्धन यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तरूणांना रोजगार : पर्यंटनातून व्यवसाय
मराठवाडा दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना कोकणातील पर्यटन व्यवसायातून मिळणार रोजगार.
मराठवाडा, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील हजारो तरुण, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोव्याकडे रवाना.
सातारा एमआयडीसीमध्ये एक हजार तरुणांना मिळणार रोजगार.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून हॉटेल व्यवसायात रोजगार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. हॉटेलमधील कामामुळे त्यांच्या राहण्याचा व जेवणाचा प्रश्न मिटेल. हॉटेल व्यावसायिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मराठवाड्यातील लोकांना काम देऊन सहकार्य करावे, यासाठी हॉटेल व्यावसायिक व नामा संस्था यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- अनिश पटवर्धन, सामाजिक कार्यकर्ते, दापोली


दापोली येथे पहिल्या टप्प्यात १०० तरुणांची आवश्यकता आहे. मराठवाड्यातील २० तरुण शेतकरी हॉटेलच्या कामाकरिता मुरुड येथील सिल्व्हर सॅण्ड रिसॉर्ट, दापोली येथील जगदीश डिलक्स येथे दाखल झाले आहेत. नामा संस्थेने मराठवाड्यातील लोकांना हॉटेल व्यवसायात संधी उपलब्ध देऊन उणीव भरून काढली आहे. त्यांच्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार मिळणार आहे.
- शैलेश मोरे, अध्यक्ष, सुवर्णदुर्ग पर्यटन संस्था


मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने आपले बिऱ्हाड घेऊन अनेक कुटुंबांनी यापूर्वीच हैद्राबाद, बेंगलोर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे गाठले आहे. मोठ्या शहरात मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुरु आहे. दुष्काळामुळे वाड्या, वस्त्या, तांडे, पाड्यांचे स्थलांतर सुरु आहे. रोजगारासाठी दाहीदिशा भटकंती सुरु झाल्याने गावे ओस पडू लागली आहेत. परंतु कुटुंबातील शाळकरी विद्यार्थी व म्हातारी माणसे, मुकी जनावरे घर धरुन आहेत, हे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.


एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार
माजी आमदार मदन भोसले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले असून, मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांना सातारा औद्योगिक वसाहतीतून रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नामाचे डॉ. अविनाश पोळ यांनी प्रयत्न केले असून, मराठवाड्यातील डॉ. राऊत यांच्या माध्यमातून लातूर, परभणी, नांदेड, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील तरुण शेतकरी सातारा औद्योगिक वसाहतीत दाखल होणार असल्याची माहिती नामा संस्थेच्या खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे.


नामा संस्थेचे ट्रस्टी डॉ. अविनाश पोळ, लातूरचे डॉ. राऊत यांच्या माध्यमातून नामा संस्थेमार्फ त शेतकरी, शेतमजूर कोकणात दाखल होण्यास मदत होत आहे. मराठवाडा व कोकण दोन्ही भागाशी त्यांनी संपर्क साधून जशी उपलब्धी तसा पुरवठा करण्याचे काम केले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना नामाने मदतीचा हात दिला आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबियांना राज्यातील इतर भागात रोजगार मिळवून दिला जाणार आहे. कोकण, गोव्यातील पर्यटन व्यवसायातून रोजगार मिळवून देण्याचा हा प्रयत्न सुरु आहे.

गोव्यात हॉटेलमध्येरोजगार
नामा संस्थेचे पदाधिकारी अभिनेते मकरंद अनासपुरे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यामध्ये आले असता गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर त्यांचे संभाषणही झाले आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना रोजगार देण्याचे आवाहन केले.

Web Title: Konkan swelling on the saddle of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.