हातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:23 AM2018-02-10T03:23:29+5:302018-02-10T03:23:43+5:30

घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला, टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत, ‘त्या’ लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले, तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले.

The knife in the hand ... 'she' waits for the photo of the Marek; Questions Security of the elderly | हातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा

हातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला, टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत, ‘त्या’ लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले, तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. नैराश्येने दरवाजा उघडून त्या नेहमीच्या कामाला लागल्या. हा त्यांचा सध्याचा दिनक्र म. ही व्यथा आहे मुलुंडच्या ६५ वर्षीय लीला अप्पा नाईक यांची. ४ वर्षांपूर्वी त्यांची ७० वर्षीय मोठी बहीण लक्ष्मी नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अद्याप मारेकºयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आजही घराच्या चार भिंतीबाहेर वाजणारी बेल मारेकºयाची तर नाही ना, यासाठी त्या तयारीत असतात.
नेहमीप्रमाणे बहिणीसोबत संवाद साधून त्या बाहेर पडल्या. घरी परतल्या, तेव्हा बहिणीचा मृतदेह त्यांना आढळून आला. अंगावरील दागिनेही गायब होते. लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. नवघर पोलिसांनी तपासाची धुरा हाती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू झाला. नातेवाइकांसह प्रत्येक संशयिताकडे चौकशी करण्यात आली. मात्र, हाती काहीच लागले नाही. अखेर फाइल बंद झाली. ती सध्या कायमस्वरूपी तपासाच्या पटलावर आहे.
लीला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी एका दाम्पत्याने घराबाबत चौकशी केली. पाणी पिण्याच्या बहाण्याने ते घरात आले. मी पाणी देण्यासाठी आत गेले असता, ती महिला स्वयंपाक घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पाणी दिल्यानंतर निघून जाण्यास सांगितले होते. पोलीस तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच जोडपे घटनेच्या काही तासाने इमारतीबाहेर पडताना दिसले होते. मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तेच माझ्या बहिणीचे मारेकरी आहेत. म्हणून त्यांचा फोटो सोबत असतो. घराची बेल तरी वाजली, तरी धडकी भरते. दाराबाहेर आरोपी तर नाही ना, म्हणून मी तयारीतच असते. दरवाजाच्या भिंगातून बाहेरच्या व्यक्तीची खातरजमा करते. घरात एकटी असताना स्वत:ला आतून लॉंक करून घेते. पोलिसांच्या तपासात पूर्वीसारखी गती दिसत नाही. तपास अधिकाºयाचीही बदली झाली. मात्र, ते माझ्या संपर्कात असतात. गेल्या दोन वर्षांत नवघर पोलीस ठाण्यातील एकही पोलीस माझ्याकडे फिरकला नाही. बहिणीच्या मृत्यूनंतर हक्क गाजविण्यासाठी आलेल्या मुलांनी मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी मीच पोलीस ठाण्याची पायरी चढले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समज देत, मला पुन्हा घरात आणले, अशीही माहिती त्यांनी दिली.

वृद्धांसाठी पोलिसांचा मदतीचा हात
घरात एकट्या राहत असलेल्या वृद्धांसाठी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. हाच मदतीचा हात त्या वृद्धांसाठी जिव्हाळ्याचा ठरत आहे. गेली २१ वर्षे माटुंगा पोलिसांच्या सहवासात असलेल्या ८१ वर्षीय ललिता सुब्रमण्यम यांचा वाढदिवस साजरा करतात. सध्या त्यांची ओळख माटुंगा पोलीस ठाण्याची ‘मम्मी’ म्हणून केली जात आहे. त्यांना मदत हवी असल्यास त्या घंटी वाजवितात. घंटीच्या आवाजाने माटुंगा पोलीस तेथे हजर होतात. पोलिसांची अशीही ओढ यातून पाहावयास मिळते.

बहिणीनेच दिला आधार...
नाईक कुटुंब मूळचे बेळगावचे. चार बहिणी, दोन भाऊ. आई-वडिलांच्या निधनानंतर मोठी बहीण लक्ष्मी यांनीच भावंडाना मोठे केले, शिकविले. लक्ष्मी नाईक या गेल्या २५ वर्षांपासून मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात राहायच्या. मुले लग्नानंतर शेजारच्याच इमारतीत राहण्यास गेली.
मात्र, लक्ष्मी आपले पती आणि लीलासोबत येथेच राहू लागल्या. पतीच्या निधानानंतर काही वर्षांपूर्वी लक्ष्मी यांना लकवा मारला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, तेव्हा लीला यांनी त्यांची देखभाल केली. लक्ष्मी यांना सुरू असलेली पेन्शन आणि लीला यांना घरकामातून मिळत असलेल्या पैशांतून त्यांचा घरखर्च चालायचा. १७ एप्रिल २०१४च्या रात्रीने लीला यांच्या आयुष्यात काळोख झाला.

आरोपीची सुटका... आणि फाइलही बंद
४ नोव्हेंबर २०१० मध्ये पेडर रोड येथे इला गांधी (६२) आणि चंपागौरी गांधी (८०) या मायलेकींची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोघींच्या नावावर असलेला १५ कोटींचा फ्लॅट बळकाविण्यासाठी सुनेने नोकर रामचंद्र गोवानेच्या मदतीने दोघींचा काटा काढल्याचा संशय गावदेवी पोलिसांना होता. या गुन्ह्यांत सून रूपल गांधी आणि नोकर रामचंद्र गोमाणे (२८) यांना अटक करण्यात आली. मात्र, रूपलने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये पुराव्याअभावी तिला या गुन्ह्यांतून निर्दाेष करार देण्यात आला.
सत्र न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रावरून गोमाणेविरुद्ध खटला सुरू झाला. रूपल ही नोकरामार्फत जेवणातून या दोघींना औषध देत होती. त्यामुळे दोघी कमकुवत होत होत्या आणि अशाच अवस्थेत रूपलने गोमाणेला दोघींची सुपारी दिली. त्याने त्यांची हत्या केली. यासाठी त्याला पैसेही देण्यात आले होते. या पैशातून त्याने त्याची उधारी चुकविल्याचे आरोपपत्रात नमूद केले होते. मात्र, मुख्य आरोपीच या गुन्ह्यातून बाहेर पडल्यानंतर, गोमानेविरुद्धचे आरोप पोलीस सिद्ध करू शकले नाही. पुराव्याअभावी गोमानेचीही सुटका झाली.

शिक्षेपेक्षा सुटकेचे प्रमाण अधिक
महाराष्ट्रात वृद्धांवरील अत्याचाराचे ४ हजार ६९४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ९९५ गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाले. २०१६ मध्ये अवघ्या १०५ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली, तर ५०४ आरोपींची पुराव्यांअभावी गुन्ह्यांतून सुटका झाली. शिक्षेपेक्षा सुटका होण्याचेच प्रमाण अधिक आहे. काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली पाहावयास मिळते.

- लक्ष्मी नाईक या फक्त अशा घटनेचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आजही अशा वृद्धांच्या हत्येच्या घटनांचा तपास अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात सर्वाधिक वृद्धांच्या हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाले. गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. असेच चित्र अन्य गुन्ह्यामध्येही आहे. त्यामुळे बºयाचशा गुन्ह्यांच्या फायली बंद झाल्या, तर ज्या गुन्ह्यांत आरोपींना अटक झाली, त्या गुन्ह्यांत ठोस पुराव्याअभावी त्यांची सुटका झाल्याच्याही घटनाही मुंबईत घडल्या. ‘तेरे भी चूप और मेर भी चूप’सारखे बरेच गुन्हे दाबले जातात, तर काही गुन्ह्यांची उकल होते.

Web Title: The knife in the hand ... 'she' waits for the photo of the Marek; Questions Security of the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.