नवमाध्यमांचे नाटकावरील आक्रमण रोखा! - कीर्ती शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:17 AM2018-06-14T01:17:30+5:302018-06-14T01:17:30+5:30

संगीत रंगभूमीतील विविधांगी बदल पचवलेल्या, बालरंगभूमी-व्यावसायिक-हौशी रंगभूमीचे योगदान ओळखून त्यांच्या जतनाचे विचार मांडणाऱ्या ९८व्या नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा.

Kirti Shiledar Speech in Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | नवमाध्यमांचे नाटकावरील आक्रमण रोखा! - कीर्ती शिलेदार

नवमाध्यमांचे नाटकावरील आक्रमण रोखा! - कीर्ती शिलेदार

googlenewsNext

लहानपणापासून मी चोवीस तास नाटकात रमले. तालमींची सवय लागली. गाणे आणि संगीत नाटकाखेरीज इतर कलांमधील चांगले टिपण्याची नजर मिळाली. उदारमतवादी आईवडिलांमुळेच चौफेर निरीक्षणासाठी वेगवेगळ्या मैफली ऐकणे, नृत्यांचे कार्यक्रम पाहणे, गद्य रंगभूमीवरील उत्तमोत्तम प्रयोग पाहणे, भरपूर वाचन यातून मन समृद्ध होत गेले.
मुंबईत आल्यावर आमचे पाय नेहमी रंगमंदिरांकडेच वळायचे. लहानपणी परळच्या दामोदर हॉलमध्ये रंगलेली नाटके आठवतात. दादरला किंग्ज जॉर्ज हायस्कूलचा रंगमंच तुडुंब गर्दीने ओसंडलेला पाहिला. आलिशान बिर्ला मातोश्री. पुढे साहित्य संघाची वास्तू बनली. दादरच्या शिवाजी मंदिराने तर हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच
केला. प्रशस्त अंगण असलेली रवींद्र नाट्यमंदिरची देखणी वास्तू. तिथेही प्रयोग करताना आणि इतरांचे प्रयोग बघताना प्रसन्न वाटत असे.
संगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मातीतला एक अभिजात कलाप्रकार. वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन, ओव्या, भारुड यातून बहुजन समाज समृद्ध झाला. लोकसंगीत, तमाशा, पोवाडा, गवळण, लावणी याही प्रकारांनी रसिक घडत गेले. शास्त्रीय संगीताची गंगोत्री महाराष्ट्रात आल्यावर रागदारी संगीताची आराधना झाली. पूर्वी नायकिणींच्या कोठ्यांवर उत्तम संगीत, गझल, ठुमरी, कव्वाली ऐकायला मिळत असे. समाजाचे तिन्ही वर्ग वेगवेगळ्या प्रकाराने आपली संगीत अभिरुची जोपासत. अण्णासाहेब किर्लोस्करांनी तिन्ही वर्गांना एका छताखाली आणले आणि संगीत नाटक हा कलाप्रकार रूढ केला. बोलपटांच्या आक्रमणानंतर संगीत नाटके बंद पडत गेली. तालीममास्तरांची करडी नजर हटल्यावर संगीत नाटक डळमळले. पुढे कंत्राटदारांनी, नाईट पद्धतीने प्रत्येक प्रयोगाचे ठरावीक मानधन, या स्वरूपात नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केल्याने नाटकांची लय बिघडली, कलाकारांवर अंकुश राहिला नाही. चुकीच्या प्रथा पडल्या. संगीत नाटक विस्कटले. याच काळात सुशिक्षित कलाकार रंगमंचावर आले आणि उत्तम गद्य नाटकांचे बंदिस्त सुंदर प्रयोग सुरू झाले. त्याचबरोबर भट्टी बिघडलेल्या संगीत नाटकांवर आणि कमी शिकलेल्या कलाकारांवर प्रच्छन्न टीकास्त्र सोडले गेले. संगीत रंगभूमी आणि गद्य रंगभूमी, हौशी, व्यावसायिक अशी दुही माजली. वक्तृत्व, पांडित्य असल्यामुळे गद्य रंगभूमीवरील रंगधुरिणांचा वरचष्मा वाढला. बेशिस्त गायक नटनट्यांच्या बेताल अदाकारीवरून संगीत रंगभूमीला वेठीला धरले गेले.
करमणुकीच्या तोंडवळ्यावरून त्या-त्या राज्याची, देशाची सांस्कृतिक ओळख होते. आमचा महाराष्ट्र संगीतवेडा, तसाच नाटकवेडा आहे. माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणुकीने सर्व जिवंत कलाप्रकारांवर आक्रमण झाल्याने नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसट तर होणार नाही ना, याची चिंता वाटते. पण त्रिनाट्यधारांना प्रेक्षकांच्या रांगा पाहून मन हर्षभरित होते. पूर्वी नाट्यव्यवसाय परस्परांच्या सहकार्याने चालत असे. पण इतर व्यावसायिक यात शिरल्यावर झपाट्याने परिस्थिती बदलली. एक पाय प्रसारमाध्यमात ठेवलेल्या सेलिब्रिटी कलाकारांच्या नाईट आणि अटींनी निर्माते गांजले. आता या माध्यमांनी नाट्यव्यवसायावर आक्रमणाचा घाट घातला आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. अशाने मूठभर लोकांचे कल्याण होईल, पण नाट्यव्यवसाय ढवळून निघेल. प्रेक्षकांच्या खिशांवर बोजा पडेल. नाट्य परिषद, सरकार, कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांनी या बदलत्या परिस्थितीचे चिंतन करायला हवे.
बालरंगभूमीतून पूर्वी कलाकार घडत. काही शाळा अजून हा उपक्रम जपतात. पण सर्वत्र हे चित्र समाधानकारक नाही. त्यात सुधारणा हवी. त्यासाठी नाटक हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. व्यावसायिक रंगभूमीला उत्तमोत्तम नाट्यकृती मिळवून देणारी हौशी रंगभूमीची चळवळ सशक्त व्हायला हवी. त्यांनाही प्रयोगांसाठी नाट्यगृह, तालमीसाठी अल्पदरात हॉल मिळणे आवश्यक आहे.
नाटक ही एकट्या कलाकाराची मिरास नसते. पडद्यामागचे, समोरचे, प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे, तंत्रज्ञ, संगीत साथीदार, नेपथ्य साहाय्यक आणि कलाकार या सर्वांनी एकचित्ताने घडवलेली कलाकृती म्हणजे नाटक. अशा कला घडवत जाव्या, त्यांच्या पाठीशी रसिकांनी आणि सरकारने पूर्ण ताकदीने उभे राहावे आणि रंगभूमी तेजानं झळाळून निघावी. हे भरतवाक्य नटेश्वराला आणि आपल्याला अर्पण.

Web Title: Kirti Shiledar Speech in Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.