बहिणीच्या लग्नासाठी नोकरानेच घातला दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:41 AM2018-06-20T04:41:24+5:302018-06-20T04:41:24+5:30

बहिणीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी अंगडियाच्या कार्यालयातील नोकराने मित्रांच्या मदतीने सव्वा कोटीच्या रोख रकमेवर सशस्त्र दरोडा टाकल्याची माहिती त्याच्या अटकेनंतर उघडकीस आली.

The job of the sister's wedding rift | बहिणीच्या लग्नासाठी नोकरानेच घातला दरोडा

बहिणीच्या लग्नासाठी नोकरानेच घातला दरोडा

Next

मुंबई : बहिणीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी अंगडियाच्या कार्यालयातील नोकराने मित्रांच्या मदतीने सव्वा कोटीच्या रोख रकमेवर सशस्त्र दरोडा टाकल्याची माहिती त्याच्या अटकेनंतर उघडकीस आली. लुटीनंतर पसार झालेल्या आठ जणांना मुंबईसह, गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून बेड्या ठोकण्यात लोकमान्य टिळक मार्ग(एलटी मार्ग) पोलिसांना यश आले.
भुलेश्वर, फोफळवाडीमधील अंगडियाच्या कार्यालयात काम करत असलेल्या रिपन पटेल हा या लुटीमागील मुख्य सूत्रधार आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून येथे कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बहिणीच्या विवाहाबाबत गावच्या घरी हालचाली सुरू होत्या. बहिणीचा विवाह थाटात करण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. पगारातून ते होणे शक्य नसल्याने, त्याने मालकाला लुटायचे ठरविले. त्याने याबाबत मित्र भाविक पांचाळ याला सांगितले. त्यानेही ग्रीन सिग्नल देताच त्यांनी लुटीचा कट आखण्यास सुरुवात केली. भाविकने यासाठी माणसे गोळा करण्यास सुरुवात केली.
ठरल्याप्रमाणे २९ मे रोजी भांडुपला राहणारा आणि सध्या अहमदाबादेत एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणारा सागर चौहान, जिगर पटेल आणि नरेंद्र जादौन हे तिघे कार्यालयात घुसले. चाकूचा धाकावर गुंगीचे औषध शिंपडलेला रूमाल नाकावर धरून, त्यांनी रिपनसह कार्यालयातील अन्य कामगारांना बेशुद्ध केले. पुढे कार्यालयात एक कोटी १३ लाख ५० हजारांची रोकड घेऊन पसार झाले.
एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद नाईक, निरीक्षक योगेंद्र पाचे, सहायक निरीक्षक दत्तात्रय म्हसवेकर यांच्या पथकाने कार्यालयातील कामगारांची चौकशी सुरू केली. या चौकशीत रिपनच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. संशय बळावल्याने पटेल याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत, पांचाळचे नाव पोलिसांना सांगितले.
मौजमजेसाठी गोव्याला पसार
संजय उर्फ संतोष चव्हाण, जिगर पटेल, नरेंद्र जादौन यांचा अहमदाबादेत जाऊन शोध घेतला. मात्र, हे तिघेही लुटीच्या पैशाने मौजमजा करण्यास गोव्याला पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोव्यातील ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमधून तिघांनाही बेड्या ठोकल्या. या तिघांनी पैसे चोरल्यानंतर, त्यातले सुमारे २० ते ३० लाख आधीच वेगळे करून स्वत:साठी ठेवले आणि लुटीत ८० लाख हाती लागल्याचे नाटक केले होते. एलटी मार्ग पोलिसांच्या अन्य पथकांनी आग्रा येथून दीपक भदोरिया, अहमदाबादेतून कल्लू शर्मा आणि पंकज प्रजापती यांना बेड्या ठोकल्या. या सर्वांकडून आतापर्यंत ९२ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
।दोन वेळा केली पाहणी
लुटीचा डाव आखल्यानंतर लुटारूंनी दोन वेळा कार्यालयाची पाहणी केली होती. त्यानंतर, त्यांनी हे पैसे चोरून पळ काढला, तसेच त्यांनी उर्वरित रकमेचे काय केले? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The job of the sister's wedding rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा