अथक मेहनत, इच्छाशक्तीने घडवला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:50 AM2019-06-16T04:50:52+5:302019-06-16T06:35:53+5:30

दुसऱ्यांदा पटकावला उत्तर अमेरिकन चॅम्पियनशिप किताब

Irresistible effort, 'Iron Man' created by willpower; Swarup Puranik's Suyash | अथक मेहनत, इच्छाशक्तीने घडवला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश

अथक मेहनत, इच्छाशक्तीने घडवला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश

googlenewsNext

मुंबई : तुमच्यातील ताकदीची परीक्षा घेणारी क्रीडा क्षेत्रातील एक कठीण चाचणी म्हणजेच ‘आयर्न मॅन ट्रायथलॉन चॅम्पियनशिप’ होय. अथक मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ही चॅम्पियनशिप पटकावली ती ३७ वर्षीय डॉ. स्वरूप पुराणिक यांनी. यंदाच्या उन्हाळ्यात २७ एप्रिल रोजी त्यांनी टेक्सासमध्ये दुसऱ्यांदा आयर्न मॅन उत्तर अमेरिकन चॅम्पियनशिपचा किताब पटकावला.

डॉ. स्वरूप यांनी दुबई येथे १ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिल्यांदा आयर्न मॅन ७०.३ चॅम्पियनशिप हा किताब पटकावला होता. डॉ. स्वरूप हे पेरीओडोंटिस्ट आणि आयआयएम पदवीधर आहेत. आयर्न मॅन ट्रायथलॉन हा ट्रायथलॉनमधील अत्यंत अवघड प्रकार असतो. यात चार हजार मीटर खुल्या पाण्यात पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. विशेषत: हे सर्व न थांबता याच क्रमाने करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करण्यास १६ तासांचा कालावधी दिला जातो. जगभरातील हा सर्वांत कठीण आणि घाम काढणारा एक दिवसीय क्रीडा प्रकार मानला जातो.

डॉ. स्वरूप पुराणिक यांनी जलतरण (एक तास २७ मिनिटे ३६ सेकंद), सायकलिंग (सात तास नऊ मिनिटे २९ सेकंद) आणि धावणे (सात तास ३५ मिनिटे ४३ सेकंद), त्रैथलॉन रेस १६ तास ३१ मिनिटे आणि १२ सेकंदांत पूर्ण केली. डॉ. स्वरूप यांच्या या यशामागील ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची व्यावसायिक शिकवणी यासाठी घेतलेली नाही.

काम, प्रशिक्षण, व्यायाम इत्यादी विविध कामे सांभाळून ही कामगिरी करणे सोपे नव्हते. आजवरच्या आयुष्यात ते नेहमीच कसलेले अ‍ॅथलेट आणि खेळाडू राहिले आहेत. अगदी लहानपणापासून पोहणे आणि इतर क्रीडा प्रकार खेळत आहेत. खेळातील त्यांचे यश लक्षवेधी आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अंडर १७ आणि अंडर १९ तसेच युनिर्व्हसिटी स्पर्धांमध्ये पोहण्यातील अनेक पदके त्यांनी मिळविली आहेत.

अष्टपैलू खेळाडू
स्वरूप पुराणिक जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरील टेबल टेनिसपटू आहेत. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू, राज्यस्तरीय कबड्डीपटू, नॅशनल क्लास बी बुद्धिबळपटू, टेनिसपटूही आहेत.

यशप्राप्तीसाठी महत्त्वाकांक्षा महत्त्वाची
तुम्ही शारीरिकदृष्ट्या कितीही फिट असलात तरी तुमच्या यशात त्याचा वाटा फक्त २० टक्के असतो. उरलेला ८० टक्के वाटा तुमचे मन, इच्छाशक्ती आणि तुमच्या महत्त्वाकांक्षेचा असतो. तुमच्यातील ताकद जोखणारी जगातील सर्वाधिक कठीण अशी स्पर्धा पूर्ण करणे हा आनंददायी, आयुष्याला पूर्णत्व देणारा आणि समाधानकारक अनुभव होता. माझ्या कुटुंबाचा आणि डी.वाय. पाटील युनिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांचा पाठिंबा मला मिळाला आणि मी आयर्न मॅन बनू शकलो, हे सांगताना मला आनंद होतोय.
- डॉ. स्वरूप पुराणिक, आयर्न मॅन.

Web Title: Irresistible effort, 'Iron Man' created by willpower; Swarup Puranik's Suyash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.