आयपीएस मंड्या यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:49 AM2018-05-16T05:49:29+5:302018-05-16T05:49:29+5:30

मुंबई पोलीस दलातून अवघ्या १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेले उपायुक्त आनंद मंड्या (६०) यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले.

IPS Mandya passes away | आयपीएस मंड्या यांचे निधन

आयपीएस मंड्या यांचे निधन

Next

मुंबई : मुंबई पोलीस दलातून अवघ्या १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेले उपायुक्त आनंद मंड्या (६०) यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मनमिळावू व प्रेमळ अधिकारी म्हणून परिचित असलेले मंड्या निवृत्तीच्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी आजारी पडले होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते रजेवर होते.
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया, सत्यपाल सिंग, अरुप पटनायक व राज्याचे माजी पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांच्या खास मर्जीतील अधिकारी होते. मात्र एकाकी आयुष्यामुळे काही महिन्यांपासून ते वैफल्यग्रस्त होते. एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची घटना ताजी असताना आणखी एक अधिकारी वैफल्यग्रस्तामुळे बळी पडल्याची चर्चा पोलीस वर्तूळ व परिचितामध्ये सुरू होती. त्यांच्या मागे दोन भाऊ व त्यांचा परिवार आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक आजी-माजी पोलीस अधिकारी व मित्रमंडळी उपस्थित होते. वाणिज्य व त्यानंतर कायद्याचे पदवीधर असलेले मंड्या १९९३च्या बॅचचे उपअधीक्षक होते. पोलीस सेवेत येण्यापूर्वी ते राष्टÑीयीकृत बॅँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सेंट झेव्हियर्समधून शिक्षण घेतलेल्या मंड्या यांची इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अनेकवेळा त्यांच्याकडून महत्त्वाच्या विषयांचे भाषांतर करून घेत असत. व्ही.पी. रोड येथील युरोपियन पोलीस क्वाटर्समधील तळमजल्यावरील खोलीमध्ये ते राहायचे. घटस्फोटानंतर ते एकटेच येथे राहायचे. गेल्या दीड वर्षापासून ते कोळे कल्याण येथील सशस्त्र दल (एलए-५)मध्ये कार्यरत होते.
आजारी रजेवर असतानाच ३० एप्रिलला ते सेवानिवृत्त झाले. गेल्या पाच दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. कुटुंबीय सदस्याशिवाय एकटे राहत असलेले आनंद मंड्या यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. मात्र कौटुंबिक एकाकीपणामुळे ते खचले होते. कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी अधिक धसका घेतला होता.
>वाहनचालकाची नऊ वर्षांची साथ
मंड्या यांच्या निधनामुळे मित्र परिवारात धक्का बसला. त्यांच्याकडे नऊ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या शंकर गायकवाड यांना अश्रू आवरत नव्हते. २००९पासून वाहनचालक म्हणून कार्यरत होते. एसआयडी, राज्य मुख्यालय, क्राइम, ट्रॅफिक ते सशस्त्र दलातील नियुक्तीपर्यंत तेच त्यांच्या गाडीचे चालक होते. मंड्या दीर्घ रजेवर असल्याने गायकवाडही तीन आठवड्यांपासून रजा काढून सोलापूरला गेले होते. रविवारी ते हजर झाल्यानंतर मंड्या यांनी त्यांना मला सोडून कोठे गेला होतास, असे विचारले होते. सोमवारी मध्यरात्री त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

Web Title: IPS Mandya passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.