म्हाडाच्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

By सचिन लुंगसे | Published: September 15, 2023 03:57 PM2023-09-15T15:57:49+5:302023-09-15T15:58:45+5:30

घरासाठी तुम्ही फॉर्म भरला का...; म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ

initiation of application registration and application filling process for sale of 5311 flats of mhada | म्हाडाच्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

म्हाडाच्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या  "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आला. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. 
 
वांद्रे पूर्व येथील एका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत बोलतांना  जयस्वाल यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या समजातील शेवटच्या घटकाला परवडणार्‍या दरातील घरे मिळवीत या उद्दिष्टपूर्ती प्रती म्हाडा कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात राज्यात जास्तीत जास्त गृहबांधींनीचे प्रकल्प उभारणीचे नियोजन सुरू असल्याचे देखिल ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, म्हाडाचे मुख्य अभियंता-१  धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३  शिवकुमार आडे, कोंकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी  मारोती मोरे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य अभियंता महेशकुमार जेसवानी आदी उपस्थित होते.

७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सुरुवात झाली.  IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सोडत प्रक्रियेत सहभाग घेणे नागरिकांच्या दृष्टीने सुलभ्सो व सोपे झाले आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम वर उपलब्ध आहे.

ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये  Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.

IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी कोंकण मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक दि. १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.

सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाइन हरकती नोंदविता येणार आहे. दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे.  तसेच त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
               
कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या नागरिकांनी PMAY योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी केलेली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. कोंकण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सोय मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमांनुसार शुल्काचा भरणा करून यशस्वी अर्जदार नोंदणी करून घेऊ शकतात.                

तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या २२७८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेतील शेवटची सदनिका विकली जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू राहील. या योजनेतील सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेण्याकरिता  https://lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज भरावा.  सोडतीतील इतर योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.in व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अनामत रक्कम भरणा व परतावा संबंधित सुविधेकरिता इंडियन बँकेच्या ७०६६०४७२१४ व ९५२९४८५७८० या कॉल सेंटर हेल्प लाइन वर संपर्क साधावा.

मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली , यावेळी सोडत प्रक्रियेच्या पारदर्शकते विषयी बोलताना त्यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये मानवी हस्तक्षेपास कोणत्याही प्रकारे वाव नाही. करिता या सदनिकांच्या विक्रीकरिता कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका. तसेच  मंडळाने कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजंट, त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्ती नेमलेले नाहीत. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची नागरिकांनी दाखल घ्यावी.

Web Title: initiation of application registration and application filling process for sale of 5311 flats of mhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा