Information and Broadcasting Ministry Dada Bhagawan - Prajaj Nihalani; Before the censor, the question of Bhansali question? | माहिती व प्रसारण मंत्रालयाने दादागिरी केली - पहलाज निहलानी; सेन्सॉरआधीच भन्साळींची चौकशी कशासाठी?

मुंबई : ‘पद्मावती’ चित्रपटास केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाचे (सेन्सॉर बोर्ड) प्रमाणपत्र मिळण्याआधीच संसदीय समितीने चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चौकशीस बोलावल्याने, आपल्याला धक्का बसल्याचे वक्तव्य सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांनी केले. मी सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष असताना, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दादागिरीचा सामना मलाही करावा लागला होता, असेही त्यांनी सांगितले.
निहलानी म्हणाले की, कुठल्याही चित्रपटाचे भविष्य ठरविण्याचा अंतिम अधिकार चित्रपट प्रमाणन बोर्डालाच आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याआधी चित्रपट निर्मात्याची चौकशी करून, तुम्ही या अधिकारालाच आव्हान देत आहात. चित्रपट प्रमाणन बोर्ड आपला अधिकार हरवून बसले आहे. माझ्या कार्यकाळात निर्णय घेताना, मलाही माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दादागिरीचा सामना करावा लागला होता, असेही त्यांनी सांगितले.

वारंवार स्पष्टीकरण का?
‘पद्मावती’बद्दल निहलानी म्हणाले की, चित्रपटावरील दोषारोपण कुठे थांबणार आहे? भन्साळी यांना किती समित्यांसमोर जावे लागणार आहे? आणि हे सगळे नेमके कुठे थांबणार आहे? भारतातील एका सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यास वारंवार स्पष्टीकरण का द्यावे लागत आहे? या प्रकरणातील संशय दूर व्हावा, यासाठी बोर्डही काही पावले का उचलत नाही? असे अनेक प्रश्न निहलानी यांनी उपस्थित केले.