नव उद्योजक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनांसाठी मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 08:23 PM2018-10-03T20:23:08+5:302018-10-03T20:23:30+5:30

मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी विद्यापीठात व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Incubation Center in Mumbai University for innovative concepts | नव उद्योजक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनांसाठी मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर

नव उद्योजक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनांसाठी मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी विद्यापीठात व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नव संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात लवकरच इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून विद्यापीठाला ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून बुधवारी राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाला इरादा पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी-२०१८ च्या अनुषंगाने विद्यापीठाने हे महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना स्टार्टअप धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने विस्तृत योजना तयार केली असून या योजनेअंतर्गत विद्यापीठाने रिनीवेबल एनर्जी, पॉलीमर्स आणि मॅग्नेटीक मटेरिअल, बायोटेक्नॉलॉजी, फार्मासीटीक्यूल, फिनटेक, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा क्षेत्राची निवड केली आहे. विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नोलॉजी या इमारतीमध्ये सुमारे १० हजार स्वेअरफूटाच्या क्षेत्राफळामध्ये इन्क्युबेशन सेंटरची उभारणी केली जाणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढविणे, विशिष्ट क्षेत्रे आणि डिझाइन उत्पादनांमधील विकास प्रक्रियांचा आरंभ करणे, आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर विद्यापीठाचा भर असून यासाठी सेक्शन-८ कंपनी एक्टच्या अनुषंगाने ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ आणि सहयोगींमध्ये क्रॉस-नेटवर्किंगद्वारे औद्योगिक संकल्पना वाढीस लावण्यास मार्गदर्शन मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून इन्क्यूबेटीने विकसित केलेल्या संकल्पनाचा पुरावा सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर आणि आयपीआर बद्दल मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध असणार आहे.

आजमितीस विद्यापीठाकडे ग्रीन टेक्नॉलॉजी येथे ५० हजार स्क्वेअर फूट आणि नॅनो सायन्स विभागात ८ हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध आहे. तसेच ६० कोटीचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या विविध विभागाचे १५० हून अधिक पेटंट आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संकल्पना तसेच अविष्कारच्या माध्यमातून येणाऱ्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरुप या इन्क्युबेशन सेंटर मुळे मिळणार आहे. नव उद्योगासांठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा विद्यापीठाकडून उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला कार्यान्वित करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने इन्क्युबेशन सेंटरसाठी लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाने हाती घेतलेले हे एक नविन उपक्रम असून याद्वारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि नवसंशोधकांना त्यांच्या नवसंकल्पनांतून उद्योगनिर्मितीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडियाच्या अनुषंगाने नव उद्योजकांमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी विद्यापीठाने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे.
- सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: Incubation Center in Mumbai University for innovative concepts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.