‘आॅक्टोबर हीट’मुळे विजेच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:34 AM2018-10-24T05:34:52+5:302018-10-24T05:35:04+5:30

आॅक्टोबर हीटच्या झळा दिवसागणिक वाढतच असून, वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणीही वाढतच आहे.

Increase in demand for electricity by October Heat | ‘आॅक्टोबर हीट’मुळे विजेच्या मागणीत वाढ

‘आॅक्टोबर हीट’मुळे विजेच्या मागणीत वाढ

मुंबई : आॅक्टोबर हीटच्या झळा दिवसागणिक वाढतच असून, वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणीही वाढतच आहे. या काळात विद्युत उपकरणे अधिक वेळ सुरू राहत असल्याने विजेच्या मागणीत वाढ होत असून, विजेच्या मागणीनुसार विजेचा पुरवठाही केला जात असल्याचा दावा संबंधित यंत्रणांनी केला आहे.
आॅक्टोबर हीटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोमवारी २४ हजार ९६२ मेगावॅट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात २१ हजार ५८० मेगावॅट तर मुंबईमध्ये ३ हजार ३८२ मेगावॅट विजेची मागणी होती. सध्या आॅक्टोबर हीटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही आॅक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात १६ आॅक्टोबरला २४ हजार ९२२ मेगावॅट तर महावितरणकडे २१ हजार ५४२ मेगावॅट, १७ आॅक्टोबरला २४ हजार ६८७ मेगावॅट तर महावितरणकडे २१ हजार २२३ मेगावॅट विजेची मागणी होती.
२२ आॅक्टोबरला ही मागणी २४ हजार ९६२ मेगावॅटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१ हजार ५८० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेची मागणी वाढल्यामुळे नियोजनाद्वारे महावितरणकडून २० हजार ६३० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला. दरम्यान, राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंत कमी आहे अशा जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर ९५० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले.
>बिघाडाशिवाय वीज पारेषित
राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने २०,६३० मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने २४,०१२ मेगावॅट वीज पारेषित केली.

Web Title: Increase in demand for electricity by October Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.