महिला प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच राहणार असेल तर मग रेल्वे मंत्रालय व त्याचा सगळा जामानिमा काय उपयोगाचा? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 08:29 AM2017-12-05T08:29:51+5:302017-12-05T08:31:20+5:30

लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी (2 डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 

If the security of women passengers is going on, then what is the use of the Railway Ministry and its all-in-law? - Uddhav Thackeray | महिला प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच राहणार असेल तर मग रेल्वे मंत्रालय व त्याचा सगळा जामानिमा काय उपयोगाचा? - उद्धव ठाकरे

महिला प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच राहणार असेल तर मग रेल्वे मंत्रालय व त्याचा सगळा जामानिमा काय उपयोगाचा? - उद्धव ठाकरे

Next

मुंबई - लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी (2 डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. ''जयबाला आशर ते ऋतुजा बोडके असा हा महिला प्रवाशांच्या असुरक्षेचा ‘प्रवास’ आहे. तो थांबणारच नसेल आणि महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच राहणार असेल तर मग एवढे मोठे ते रेल्वे मंत्रालय आणि त्याचा तो सगळा जामानिमा काय उपयोगाचा?'', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?

उपनगरी रेल्वे सेवा मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी वगैरे असल्याचे नेहमीच बोलले जाते, पण मागील काही वर्षांत प्रामुख्याने महिला प्रवाशांसाठी ही सेवा जिवावर बेतणारी ठरत आहे. शनिवारी रात्री पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर घडलेल्या घटनेने महिला प्रवाशांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे. ऋतुजा बोडके या तरुणीला चोरटय़ाने तिच्याकडील ऐवज लुटून धावत्या गाडीतून फेकून दिले. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी महिला प्रवाशांची सुरक्षा आणि त्यासाठी रेल्वेने केलेले उपाय यावर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. सप्टेंबर महिन्यात रात्री कामावरून नालासोपारा येथे घरी परतणाऱ्या कोमल चव्हाण या तरुणीला पैसे न दिल्यामुळे चोरटय़ाने धावत्या गाडीतून बाहेर फेकले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान एका शाळकरी मुलीनेही डब्यात अचानक शिरलेल्या व्यक्तीला घाबरून धावत्या गाडीतून उडी मारली होती. सरकारतर्फे एकीकडे महिला सक्षमीकरणाचे ढोल पिटले जातात, महिला सुरक्षेचे नारे दिले जातात, मात्र त्याचवेळी मुंबईतील लाखो महिलांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल तर या घोषणा काय कामाच्या? वास्तविक महिलांसाठी स्वतंत्र डबे ही महिलांची सोय आणि सुरक्षाच आहे, पण हे डबेही त्यांच्यासाठी असुरक्षित बनले आहेत.

गर्दीच्या वेळेस दरवाज्यातून पडण्याचा धोका आणि गर्दी नसताना चोरटय़ांनी गाडीबाहेर फेकण्याची भीती अशा कोंडीत मुंबईतील महिला सापडल्या आहेत. महिलांच्या डब्यात पोलीस तैनात केल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे नेहमीच केला जातो. तशाच डब्यातून महिलांनी प्रवास करावा असा अनाहूत सल्ला देणाऱ्या उद्घोषणाही दिल्या जात असतात. मग ऋतुजा बोडके ज्या महिला डब्यात बसली होती तेथे पोलीस का नव्हता? अर्थात बारा डबा लोकलमध्ये महिलांसाठी राखीव डबे सहा आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस मात्र तीनच असे व्यस्त प्रमाण असल्यावर दुसरे काय होणार? ही स्थिती बदलत नाही तोपर्यंत रोजच एखाद्या कोमल किंवा ऋतुजाला जीवघेण्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार हे उघड आहे. महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले हे चांगले असले तरी त्यांच्या फुटेजचा उपयोग घटना घडून गेल्यानंतरच्या पोलीस तपासासाठीच करायचा, असा ठाम समज रेल्वे प्रशासनाने करून घेतलेला दिसत आहे. खरे म्हणजे या सीसीटीव्हीद्वारा महिला डब्यांमधील हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले गेले, त्यांचे व्यवस्थित ‘मॉनिटरिंग’ केले गेले तर एखाद्या आणीबाणीप्रसंगी पीडित महिलेला वेळीच मदत मिळू शकेल. मात्र आपल्याकडे अनेकदा उपाययोजनांकडे फक्त ‘घोषणा’ म्हणूनच पाहिले जाते. शनिवारसारखी एखादी घटना घडली की त्यावर चर्चा होते, नंतर पुन्हा सगळे शांत होते.

जयबाला आशर या महाविद्यालयीन तरुणीला एका माथेफिरू तरुणाने लोकलमधून फेकून दिल्याच्या घटनेला आता जवळजवळ १९ वर्षे उलटली. १९९८ मध्ये ही घटना घडली होती. त्यात तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते. मग या दोन दशकांत बदलले काय? तर महिला डब्यात महिलांवर झालेले हल्ले आणि त्यात जखमी वा मृत झालेल्या महिलांचे आकडे. चार वर्षांपूर्वी रबाळे-घणसोलीदरम्यान आरती घोलपकर यांचा चोरटय़ाने हल्ला केल्याने लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. एक्प्रेसमधून मुंबईला येणाऱ्या रेखा नवले यांना कल्याण-ठाकुर्लीदरम्यान चोरटय़ांनी डब्यातून फेकून दिले होते. सपना शुक्ल या तरुणीलाही तिच्या गळय़ातील चेन खेचून दोघांनी तिला कुर्ला स्टेशनवर लोकलमधून फेकून दिल्याने जीव गमवावा लागला होता. आता ऋतुजा बोडकेवरही असाच प्रसंग आला. सुदैवाने तिचा जीव बचावला. पोलीस उद्या तिला ढकलणाऱ्या चोरटय़ाला पकडतीलही, पण मुंबईतील लोकलमधून महिलांनी किती काळ जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा, या प्रश्नाचे काय उत्तर रेल्वे प्रशासनाकडे आहे? जयबाला आशर ते ऋतुजा बोडके असा हा महिला प्रवाशांच्या असुरक्षेचा ‘प्रवास’ आहे. तो थांबणारच नसेल आणि महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच राहणार असेल तर मग एवढे मोठे ते रेल्वे मंत्रालय, प्रशासन आणि त्याचा तो सगळा जामानिमा काय उपयोगाचा?

Web Title: If the security of women passengers is going on, then what is the use of the Railway Ministry and its all-in-law? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.