घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावटीमध्ये दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:34 AM2018-09-12T05:34:47+5:302018-09-12T05:35:10+5:30

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत.

Home, public Ganeshotsav boards | घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावटीमध्ये दंग

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावटीमध्ये दंग

Next

मुंबई : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत. तर घरगुती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्यासह पुरोहितांची वेळ ठरवण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसत आहे. परिणामी, मंगळवारी मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये मुंबईकर गणेशभक्तांची गर्दी दिसून आली.
बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाºया साहित्यासह आरतीसाठी आवश्यक टाळ, आरतीची पुस्तके, ढोल अशा विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी बाजारपेठांत गर्दी केली होती. आरतीसाठी आवश्यक कापूर, अगरबत्ती, निरांजन, ताम्हणपात्र, कलश, चौरंग अशा वस्तूंना अधिक मागणी होती. तर थर्माकोलला पर्याय म्हणून कापडी आणि कागदी सजावटीच्या वस्तूंची शोधाशोध करतानाही गणेशभक्त दिसले.
मुंबईतील नामांकित गणेश मंडळांंनीही मंगळवारीच फोटो सेशनचा मुहूर्त साधला. प्रसारमाध्यमांच्या मदतीने गणेशभक्तांना बाप्पाच्या पहिल्या दर्शनाची संधी मंडळांनी उपलब्ध करून दिली. त्यात लालबाग मार्केटमधील लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, वडाळ्यातील जीएसबी या मंडळांचा समावेश होता. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीने बुधवारी माध्यमांना छायाचित्रे घेण्यास विशेष वेळ राखून ठेवली आहे. प्रसारमाध्यमांसाठी ठेवलेल्या फोटो सेशनचा फायदा घेत गणेशभक्तांनी मोबाइलमध्ये छायाचित्र टिपण्यासाठी गर्दी केली होती.
एसटी आगार हाउसफुल्ल : कोकणाकडे जाणाºया एसटी हाउसफुल्ल दिसत असत. मुंबई सेंट्रल, कुर्ला, पनवेल अशा सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत आहे. मिळेल त्या गाडीने जमेल त्या परिस्थितीत चाकरमानी गावाकडे धाव घेत आहेत.
>फुल्ल नाइट, वातावरण टाइट!
अवघ्या काही तासांत प्राणप्रतिष्ठापना करायची असल्याने सजावटीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. मंगळवार व बुधवारी रात्रभर मंडळातील कार्यकर्ते काम करताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे अंतिम टप्प्यात आलेले घरगुती गणपतींच्या आरासचे काम करण्यासाठी बहुतेक भक्तांनी कार्यालयांतून एक दिवस आधीच सुट्टी टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Home, public Ganeshotsav boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.