मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 07:51 AM2017-09-20T07:51:25+5:302017-09-20T19:27:50+5:30

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. बुधवारी सकाळदेखील पावसाची संततधार कायम आहे.  येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

heavy rains lash out in mumbai city on alert | मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

Next

मुंबई, दि. 20 - मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. बुधवारी सकाळदेखील पावसाची संततधार कायम आहे.  येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासननं घेतला आहे. हा दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढण्यात येईल अशी घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.  या बद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी याची सूचना जारी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. 
UPDATES  - 
- कुलाबा वेधशाळेनं 191 मिमी पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेत 275 मिमी पावसाची नोंद. मंगळवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून ते आज पहाटे 5.50 वाजेपर्यंत पावसाची नोंद
- वसई, विरार, नालासोपा-यात ठिकठिकाणी साचलं पावसाचं पाणी
- कोसळधार पावसामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांचा आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय 
- मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद, दोन्ही धावपट्ट्यांवरून विमानांची उड्डाणं रद्द
- मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचू नये याकरता पंप सुरू, पाण्याची निचरा सुरू असल्याची माहिती
- प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून समुद्र किनारी, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याची सूचना दिल्याची माहिती
- मुंबईत रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ कमी

- मीरा रोड/ ठाणे : भाईंदरच्या उत्तन समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किमी अंतरावर ब्लेसिंग नावाची मच्छीमार बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. बोटीवर नाखवा व खलाशी असे मिळून एकूण 10 जण होते. यावेळी समुद्रातील अन्य बोटींवरील मच्छिमारांनी या खलाशांचे जीव वाचले.  दरम्यान, बुडालेल्या बोटीचा शोध सुरू आहे. 

नवी मुंबईत 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 झालेली पावसाची नोंद 
बेलापूर  226.00 मिमी 
नेरुळ 206.30 मिमी
वाशी 175.70 मिमी
ऐरोली 178.40 मिमी
सरासरी 196.60 मिमी

पुण्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले

पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. या धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरित पाहता मुठा नदीला पूर आल्याचे दिसते, कारण येथील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच, काही नदीपात्रात असलेली वाहने पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.  मंगळवार (19 सप्टेंबर) पासून एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली. त्यानंतर आजही दिवसभर कधी जोर तर कधी संतधार असा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याने 25 पैकी जवळपास 16 धरणे शंभर टक्के  भरली आहेत. 

मुंबईत वादळ येणार ही निव्वळ अफवा
मुंबईत दुपारी तीनच्या सुमारास वादळ धडकणार असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेले मेसेज निव्वळ अफवा आहे. मुंबईत असे कुठलेही वादळ धडकणार नसून नागरीकांनी हा मेसेज फॉरवर्ड करु नये तसेच कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेने टि्वट केले असून, त्यात भारतीय हवामान विभागाचा हवाला दिला आहे.  

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद

मुंबईत मंगळवारी (19 सप्टेंबर) दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई विमानतळाची  मुख्य धावपट्टी बंद आहे. रनवे 14, रनवे 32वरुन विमानाचे उड्डाण आणि लँडीग सुरु आहे. पण सोसाटयाच्या वा-यामुळे हवाई वाहतुकीचा वेग मंदावला आहे. 

मुंबईतून 108 उड्डाणे रद्द, इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकिटांची सर्व रक्कम करणार परत

मुंबईत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवाई सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, सर्व प्रवाशांना एसएमएस, फोन, ई-मेलच्या माध्यमातून बदललेल्या वेळेची माहिती देण्यात येत असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले.  20 सप्टेंबरचे मुंबईतून किंवा मुंबईत येणा-या इंडिगो विमानाचे तिकीट बुक करणा-या सर्व प्रवाशांना तिकीटाची संपूर्ण रक्कम 100 टक्के पैसे परत करण्यात येतील तसेच प्रवाशांना तिकीटाची तारीख बदलून हवी असेल तर कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. प्रवासी ऑनलाइनही त्यांचे तिकीट रद्द करु शकतात असे इंडिगोकडून सांगण्यात आले. 

8 घरांवर कोसळली दरड

भांडूप येथील खिंडीपाडामध्ये साईनाथ मित्रमंडळाजवळील कब्रस्तानाजवळ 8 घरांवर दरडीचा भाग कोसळला. मंगळवारी ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोन व्यक्तींना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढण्यात आले.यानंतर त्यांना महापालिकेच्या मुलुंड जनरल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. विजयंदर जैसवाल (27 वर्ष) आणि कृष्णा यादव (24 वर्ष) अशी जखमींची नावं आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

शॉर्ट सर्किटच्या घटना
मुंबई शहरात 7, पूर्व उपनगरात 5 व पश्चिम उपनगरात 9 अशा एकूण 21 ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

झाडे कोसळली
मंगळवारी मुंबईत शहरात 60, पूर्व उपनगरात 37 व पश्चिम उपनगरात 71 अशा एकूण 168 ठिकाणी झाडे/ फांद्या कोसळल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. 

मंगळवारी रात्री मिठी नदीची पातळी 2.8 मीटर इतकी वाढल्यामुळे क्रांती नगर येथील झोपड्यांमध्ये राहणा-या 80 ते 100 जणांना बैलबाजार महापालिका शाळा व कराची खासगी शाळेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले होते. यानंतर बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपआपल्या घरी परतले. 
 


पनवेल करंजाडे नदी

वर्सोवा - मुंबई मेट्रोवर जोरदार पावसाचा कोणताही परिणाम नाही, वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसीत मंदावली वाहतूक










Web Title: heavy rains lash out in mumbai city on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.