Gudi Padwa 2018 : मुंबईकरांनी उभारली ‘प्रबोधना’ची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:16 AM2018-03-19T02:16:50+5:302018-03-19T02:16:50+5:30

सूर्याची कोवळी किरणे पृथ्वीतलावर अवतरली आणि गुढी पूजनाने मुंबापुरीची सकाळ उजळून निघाली. साखर, कडूनिंबाची पाने, झेंडूचे तोरण आणि भगव्या झेंड्याच्या सहवासात मुंबापुरीच्या घराघरात उत्साहाचे वातावरण सुरू झाले.

Gudi Padwa 2018: The Prabodhana Gudiya created by Mumbaikar | Gudi Padwa 2018 : मुंबईकरांनी उभारली ‘प्रबोधना’ची गुढी

Gudi Padwa 2018 : मुंबईकरांनी उभारली ‘प्रबोधना’ची गुढी

googlenewsNext


सूर्याची कोवळी किरणे पृथ्वीतलावर अवतरली आणि गुढी पूजनाने मुंबापुरीची सकाळ उजळून निघाली. साखर, कडूनिंबाची पाने, झेंडूचे तोरण आणि भगव्या झेंड्याच्या सहवासात मुंबापुरीच्या घराघरात उत्साहाचे वातावरण सुरू झाले. जसाजसा सूर्य डोक्यावर येऊ लागला तसतशी शोभायात्रांमधल्या ढोलताशांच्या निनादाने मुंबापुरी दुमदुमू लागली. फेटे आणि नऊवारी नेसून बुलेटवर स्वार झालेल्या महिला, बच्चेकंपनीसह थोरामोठ्यांनी केलेल्या वेशभूषा, ढोलताशांसह लेझीमचा सूर आणि यावर थिरकणाऱ्या पावलांनी शोभायात्रांमध्ये प्राण ओतला. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या शोभायात्रांनी प्रबोधनात्मक, तसेच सामाजिक संदेश देतानाच महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शनही घडविले. उत्साहाने संचारलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रांत रांगोळ्यांनीही भर घातली. सेल्फीने उत्साह वाढविला. हाच उत्साह दिवसभर कायम असताना सायंकाळी सोशल मीडियावरही गुढीपाडव्याच्या छायाचित्रांनी भर घातली आणि अवघी मुंबापुरी गुढीपाडव्याच्या उत्साहात न्हाऊन निघाली.
प्रभादेवी येथे हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हाती ‘बेटी बचाव’चा संदेश देणारे फलक होते. त्यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला, तर संत गाडगेबाबांची वेशभूषा धारण केलेला तरुण उपस्थितांना स्वच्छतेबाबत संदेश देत होता. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील चिमुरड्या मुली ‘मुलींना शिकवा’ असा संदेश देत होत्या.
प्रभादेवीच्या मंडळाचे नववर्ष स्वागत यात्रेच्या आयोजनाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. रविवारी सकाळी ९ वाजता येथील राजाभाई देसाई उद्यानाजवळून स्वागतयात्रेला सुरुवात झाली. या वेळी लेझीम, ढोल-ताशांच्या नादात परिसर दुमदुमून गेला होता. यात्रेमध्ये ७०० हून अधिक प्रभादेवीकर सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती. राजाभाई उद्यानाजवळ २० फुटांची गुढी उभारून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. उद्यानापासून सुरू होऊन स्वागतयात्रा वाकडी चाळ, मुरारी धाग मार्ग, न्यू प्रभादेवी मार्ग, जुनी प्रभादेवी, सयानी रोड परिसरातून दुपारी १च्या दरम्यान परत उद्यानाजवळ पोहोचली.
दहिसर हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. पूर्वेकडील गावदेवी मंदिरापासून सुरुवात होऊन मंडपेश्वर गुफा येथे यात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या नागरिकांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते, तसेच ढोल-ताशा पथक, नाशिक बाजा, बँजो या पारंपरिक वाद्यांच्या निनादाने परिसराला वेगळाच रंग चढला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी यांची वेशभूषा साकारलेल्या कलाकारांनी यात्रेची शोभा वाढविली. अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अवयवदान प्रचाराचा चित्ररथ शोभा यात्रेत समाविष्ट करण्यात आला होता.
>मंदार निकेतन उत्सव मंडळातर्फे यंदाही भायखळा येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा भायखळा पश्चिमेकडील ना. म. जोशी मार्गावरील मंदार निकेतन इमारतीच्या प्रांगणापासून सकाळी ९ वाजता सुरू झाली व आर्थर रोड नाक्यापर्यंत जाऊन, तिथून परत माघारी मंदार निकेतनच्या प्रांगणात दुपारी २ वाजता समाप्त झाली. या वर्षी ‘महाराष्ट्राची वारकरी परंपरा’ हा शोभायात्रेचा विषय होता. यामध्ये विठ्ठल-रक्मिणी मंदिर देखावा, संत तुकाराम वैकुंठ गमन देखावा व पाचशे वारकरी सहभागी झाले होते.
>चारकोप सेक्टर ९मधील स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे स्वामी समर्थ मठातून नववर्षांचे स्वागत आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त पालखी काढण्यात आली. ही पालखी मठापासून सुरू होऊन सेक्टर ९ मधल्या सर्व सोसायट्यांमध्ये फिरून परत मठात सांगता झाली. पालखीमध्ये बँजो, लेझीम पथकाच्या तालावर चारकोपवासीय थिरकले. महिलावर्गांनीही मोठ्या संख्येने एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.
>जोगेश्वरी येथे शोभायात्रेत पालखीत विराजमान झालेल्या गणरायाचे पूजन करण्यात आले. संत परंपरेच्या देखाव्यात विविध संतांचे (साईबाबा, तुकाराम, रामदास, ज्ञानदेव, मुक्ताई, मीराबाई, संत गाडगेबाबा, शिवाजी महाराज आदी) पोषाख घालून शोभायात्रेत सामील झालेली लहान मुले आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. महिलांची बाइक रॅली, कोळीनृत्य, आदिवासींचे तारपानृत्य, ढोल, ताशा, बेंजो अशा वाद्याच्या गजरातील शोभायात्रा पाहण्यासाठी, स्थानिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
>मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव, रमेश हॉटेल, तानाजीनगर, आदर्शनगर, शिवाजीनगर, भीमनगर आणि आप्पापाडा येथील वेगवेगळ्या मंडळांनी एकत्र येत भव्य शोभायात्रा काढली. या वेळी विदेशीपेक्षा स्वदेशी राहणीमान किती चांगले आहे, हे सांगणारे पोस्टर, शाकाहारी अन्न आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, हे दर्शविणारे फलक वाहनांवर लावण्यात आले होते, तसेच जवान देशासाठी स्वत:चे प्राण पणाला लावून देशाचे संरक्षण करतात, याचे महत्त्व सांगणारी वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांनी केली होती.
>महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचे दर्शन घडवत गिरगावकरांनी नवीन वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले. सकाळी ८ वाजता श्रीगणेश मंदिरापासून निवृत्त उपसचिव अनुराधा गोखले, महाराष्ट्र टुरिझमच्या विभागीय संचालिका नीला लाड यांच्या हस्ते गुढीपूजनाने यात्रेस सुरुवात झाली. पारंपरिक वेशात दुचाकीवर स्वार झालेल्या १०० महिलांचे आदिशक्ती पथक, तरुणांचे युवाशक्ती पथक, इलेक्ट्रिक दुचाकीस्वारांचे पथक यात्रेचे नेतृत्व करीत होतो. पारंपरिक वेशातील तरुणाई सामील झाली होती.
>गोराईमध्ये ‘बेटी बचाओ’ संदेश : बोरीवली येथील गोराई परिसरामध्येही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नववर्षानिमित्त शोभायात्रा पार पडली. पारंपरिक वेशभूषेमधील तरुणाई आणि त्यांना तेवढीच दमदार साथ दिलेल्या स्थानिक रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या शोभायात्रेला रंगत आली होती. परिसरातील तरुणांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या स्वयम् युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग ९व्या वर्षी ही स्वागतयात्रा पार पडली. यंदा या शोभायात्रेच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. तसेच, आम्ही मावळे ढोलताशा पथकाने जबरदस्त वादन करत गोराईकरांना आपल्या तालावर थिरकायला लावले. ढोलपथकाच्या दणकेबाज सादरीकरणाला, ध्वजपथकाचा ठेका आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असलेला जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाचे झाले होते. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने गोराईकरांनी आणि रहिवासी संस्थांनी सहभाग घेत तरुणाईच्या उपक्रमाला उत्स्फूर्र्त पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे बोरीवली पोलिसांचे मोलाचे सहकार्यही या वेळी तरुणांना मिळाले.
>कुर्ल्यात अवतरले १०१ बाल ज्ञानेश्वर
नववर्षाच्या स्वागतासाठी कुर्ल्यात कलाकरांनी विविध वेशभूषा करून स्वागत यात्रेत रंगत आणली. यात बालकलाकारही मागे नव्हते. १०१ बालकलाकार संत ज्ञानेश्वरांचे रूप धारण करत, भारत सिनेमा, कुर्ला (प.) येथे एकत्रित आले. त्यांनी सामूहिक पसायदान गात, हिंदुत्व हेच विश्वबंधुत्व असा संदेश दिला. बाल गोपाळ मंडळ पत्राचाळ येथील कलाकारांनी बनविलेली संत ज्ञानेश्वरांची १५ फूट भव्य पर्यावरणपूरक मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. परिसरातील सर्व मंडळे, संस्था एकत्र येऊन कुर्ल्यातील सामूहिक गुढी उभारण्याचा प्रयत्न या मागे असतो.
>गिरगावच्या शोभायात्रेचे आकर्षण कायम
राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया शिवराज्याभिषेक रथाचा आराखडा बनविणारे, प्रा. नरेंद्र विचारे नववर्ष संकल्प सभेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारा व प्रथम पारितोषिक विजेता शिवराज्यभिषेक चित्ररथ गिरगाव यात्रेची शान वाढवत होता.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा घारापुरी लेणींवर आधारित चित्ररथ, मूर्तिकार योगेश ईस्वलकरांनी साकारलेली समर्थ रामदास स्वामी यांची २२ फुटी प्रतिकृती, कला दिग्दर्शक तुषार कोळी यांनी साकारलेला चलचित्रासहीत खंडोबारायाचा देखावा, धोबीवाडी उत्सव मंडळातर्फे म्हातारीचा बूट, कापरेश्वर मार्ग मंडळातर्फे पंढरीची वारी, शहीद गौरव समितीतर्फे स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी, विश्व हिंदू परिषद अंतर्गत वनवासी कल्याण केंद्र, तळासरी यांच्या वनवासी टुरिझम अंतर्गत तारपा नृत्य व तेथील लोकसंस्कृती, कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची स्मृती जपणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
प्रतापगड, अष्टविनायक, अभयारण्य, महालक्ष्मी मंदिर, आॅगस्ट क्रांती मैदान, मुंबई सेंट्रलला जगन्नाथ शंकरशेठ स्थानक नाव देण्याची मागणी करणाºया विविध विषयांवरील चित्ररथ यात्रेत सहभागी झाले.
गोरेगाव पूर्वेकडील बावटेवाडी येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे ‘गोरेगाव सांस्कृतिक सोहळा’चे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या वतीने गोरेगाव येथे शोभायात्रा काढण्यात आली. ‘साईराज’ ढोल पथकाच्या तालावर गोरेगावकर मंत्रमुग्ध झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेझीम

Web Title: Gudi Padwa 2018: The Prabodhana Gudiya created by Mumbaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.