सखल भागांचे जिओ टॅगिंग, पंप न चालल्यास संबंधितांवर कारवाई; आयुक्तांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:09 AM2024-04-11T10:09:15+5:302024-04-11T10:10:58+5:30

मुंबईत मुसळधार पावसात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात.

geo tagging of low lying areas action against concerned if pump is not working instructions by given bmc commissioner in mumbai | सखल भागांचे जिओ टॅगिंग, पंप न चालल्यास संबंधितांवर कारवाई; आयुक्तांच्या सूचना

सखल भागांचे जिओ टॅगिंग, पंप न चालल्यास संबंधितांवर कारवाई; आयुक्तांच्या सूचना

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरांत मिळून ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्यप्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिल्या.

यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी मंगळवारी आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. यंत्रणांनी सखल भागांतील पाणी साचण्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज राहावे. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून योगदान दिल्यास कोणतीही आव्हानात्मक स्थिती एकत्रित प्रयत्नाने टाळता येईल. सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन  गगराणी यांनी केले. 

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीला मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ, सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत, आयुकल कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आदी उपस्थित होते.

रेल्वे आणि पालिकेने मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरी रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथगतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जलसाठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. रेल्वेमध्ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.

Web Title: geo tagging of low lying areas action against concerned if pump is not working instructions by given bmc commissioner in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.