लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:05 AM2024-04-15T11:05:08+5:302024-04-15T11:07:48+5:30

मुंबईतून लोकसभेत आतापर्यंत मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या खासदार निवडून गेल्या आहेत.

for upcomg lok sabha election 2024 there is no woman candidate from major parties in mumbai yet | लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही 

लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही 

मुंबई : मुंबईतून लोकसभेत आतापर्यंत मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या खासदार निवडून गेल्या आहेत. त्यांच्यानंतरही निवडून आलेल्या महिला खासदारांनी मुंबईतील विविध प्रश्न लोकसभेत मांडत ते सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा वंचित बहुजन आघाडी सोडल्यास एकाही प्रमुख पक्षाने अद्याप महिला उमेदवारास तिकीट दिलेले नाही.

२०१९ मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण ११६ उमेदवारांपैकी अवघ्या १५ महिला होत्या, तर मुंबई दक्षिण मतदारसंघातून एकाही महिलेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या होत्या. 

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या २७ उमेदवारांपैकी सात महिला होत्या; पण हा अपवाद वगळता कुठे तीन, कुठे दोन इतक्याच उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

लोकसभेत मुंबईतून प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खासदारांचा इतिहास लिहायचा झाल्यास सुरुवात ‘चले जाव’, स्वदेशीच्या चळवळीत हिरिरीने भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसच्या लढाऊ नेत्या जयश्री रायजी यांच्या नावापासून करावी लागेल. त्यांच्या नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या मृणाल गोरे, जनता पक्षाच्या अहिल्या रांगणेकर या लढाऊ बाण्याच्या महिला नेत्या मुंबईतून संसदेवर निवडून गेल्या. या दोघींच्या संसदीय कारकीर्दीबाबत तर विरोधकही आदराने बोलतात. 

भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी तीन वेळा, तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी दोन वेळा मुंबईतून खासदारकी भूषवली; परंतु २०२४ मध्ये अद्यापही एकाही प्रमुख पक्षाला मुंबईतून महिलांना उमेदवारी द्यावीशी वाटलेली नाही.

विधानसभेत २१ महिलांना तिकीट-

२०१९च्या विधानसभेत ३६ पैकी अवघ्या २१ मतदारसंघांत महिलांना तिकीट देण्यात आले होते. मुंबईत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या ४५ टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या ३३४ उमेदवारांपैकी महिलांचे प्रमाण फक्त ९ टक्के होते. म्हणजे अवघ्या ३१ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यापैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन महिलांना तिकीट दिले होत, तर शिवसेनेकडून अवघी एक महिला निवडणूक लढवत होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकाच महिलेला तिकीट दिले होते. 

मुंबईतील महिला राज-

१९५२ मध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत बॉम्बे सबर्बन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातून जयश्री रायजी या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या काँग्रेसच्या नेत्या निवडून आल्या होत्या.

१) मुंबई उत्तर पूर्वमधून १९६७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तारा गोविंद सप्रे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या जयवंतीबेन मेहता या १९८९ मध्ये या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

२) दक्षिण मुंबईतूनही १९९६ आणि १९९९ अशा दोन वेळा निवडून येण्याचा मान जयवंतीबेन मेहता यांनी मिळवला आहे.

३) मुंबई उत्तर मध्यमधून भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर १९७७ मध्ये निवडून आल्या होत्या तर १९८० मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला दंडवते यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००९ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडून आल्या.

४) तत्पूर्वीच त्या उत्तर पश्चिम मुंबईतून सुनील दत्त यांच्या निधनानंतर २००५च्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या पूनम महाजन या मतदारसंघातून निवडून आल्या.

Web Title: for upcomg lok sabha election 2024 there is no woman candidate from major parties in mumbai yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.