कलाप्रेमींना महाराष्ट्रात प्रथमच घडणार कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे दर्शन

By संजय घावरे | Published: February 29, 2024 02:41 PM2024-02-29T14:41:36+5:302024-02-29T14:41:51+5:30

स्वातंत्र्यसैनिक रुमाले चेन्नबसवय्यांच्या 'वर्ण मैत्री'चे प्रदर्शन, या प्रदर्शनात शिल्पकार व्यंकटचेलापती यांनी रेखाटलेल्या रुमाले चेन्नबसवय्या यांच्या आकर्षक प्रतिमेसह निसर्गाची भव्यता दर्शवणाऱ्या जलरंगातील लार्जर-दॅन-लाइफ रचनाही असतील

For the first time in Maharashtra, art lovers will get to see the paintings of Karnataka painters | कलाप्रेमींना महाराष्ट्रात प्रथमच घडणार कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे दर्शन

कलाप्रेमींना महाराष्ट्रात प्रथमच घडणार कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे दर्शन

मुंबई - जगभरातील कलाप्रेमींमध्ये 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग ऑफ इंडिया' अशी ओळख असणारे मास्टर आर्टिस्ट स्वातंत्र्यसैनिक रुमाले चेन्नबसवय्या यांच्या कलाकृतींचे दर्शन कलाप्रेमींना प्रथमच महाराष्ट्रात घडणार आहे. चेन्नबसवय्या यांच्या 'वर्ण मैत्री' या चित्रांचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये (एनजीएमए) भरणार आहे. हे प्रदर्शन विक्रीसाठी नसून, चेन्नबसवय्यांच्या कलेच्या सन्मानार्थ भरवण्यात येणार आहे. 

पूर्वी प्रामुख्याने केवळ कर्नाटकात ओळखल्या जाणाऱ्या चेन्नबसवय्या यांचा कलात्मक वारसा या चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १ ते १५ एप्रिल या कालावधीत रुमाले चेन्नबसवय्या  यांचे 'वर्ण मैत्री' नावाचे उल्लेखनीय पूर्वलक्षी प्रदर्शन भरणार आहे. चेन्नबसवय्या यांच्याशी घनिष्ठ नातेसंबंध असलेल्या माधव कबे कुटुंबाने हे प्रदर्शन त्यांच्यावरील प्रेम आणि आदरापोटी आयोजित केले आहे. हे प्रदर्शन विक्रीसाठी नाही तर केवळ चेन्नबसवय्यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित केले आहे.

या पूर्वलक्षी प्रदर्शनात ८० कलाकृती आणि चेन्नबसवय्यांच्या तीन प्रिंट्स असतील. ज्यात त्यांनी रंगवलेल्या विषयांच्या तीन प्रमुख शैलींचा समावेश असेल. त्या शैली म्हणजे सिटीस्केप्स म्हणजेच बंगलोरच्या फुलांवर विशेष भर, लँडस्केप्स आणि अध्यात्म या आहेत. यासाठी कागदावरील जलरंग, कॅनव्हासवरील तेल आणि रेखाचित्रे यांचा वापर करण्यात आला आहे. दोन प्रमुख संकल्पना बंगलोरमधील फुलांच्या वैभवाभोवती फिरतात, ज्यात १९३० च्या दशकातील दुर्मिळ कामांवर आणि कर्नाटक-श्रीलंकेतील लँडस्केप लक्ष वेधून घेतील.

या प्रदर्शनात शिल्पकार व्यंकटचेलापती यांनी रेखाटलेल्या रुमाले चेन्नबसवय्या यांच्या आकर्षक प्रतिमेसह निसर्गाची भव्यता दर्शवणाऱ्या जलरंगातील लार्जर-दॅन-लाइफ रचनाही असतील. १९३० च्या दशकाच्या मध्यात महात्मा गांधीजींसोबतचे रुमाले यांचे छायाचित्र आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रदान केलेले ताम्रपत्र यांसारख्या दुर्मिळ वस्तू चेन्नबसवय्यांच्या बहुआयामी जीवनाची आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची झलक दाखवतील. रुमाले यांच्या गुरूंच्या आणि भारत-श्रीलंकेमधील पवित्र स्थळांच्या कलाकृती आध्यात्मिक अनुभूती देतील. रुमाले आर्ट हाऊस, बेंगळुरू येथील केएस श्रीनिवास मूर्ती आणि एनजीएम, मुंबईच्या डेप्युटी क्युरेटर श्रुती दास यांनी या प्रदर्शनाची सह-निर्मिती केली आहे.

Web Title: For the first time in Maharashtra, art lovers will get to see the paintings of Karnataka painters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.