एका दिवसात वाढले पाच लाख बेस्ट प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:00 AM2019-07-11T01:00:49+5:302019-07-11T01:08:36+5:30

प्रवासभाडे कपातीचा फायदा: बस वाढवण्याची मागणी

Five lakh best traveled in a single day | एका दिवसात वाढले पाच लाख बेस्ट प्रवासी

एका दिवसात वाढले पाच लाख बेस्ट प्रवासी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बस भाड्यात कपात होताच गेल्या काही वर्षांपासून बेस्टपासून दुरावलेले प्रवासी परतले आहेत. ५ किलोमीटरपर्यंत अवघ्या ५ रुपयांमध्ये प्रवास करता येत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणूनच मंगळवारी पहिल्याच दिवशी प्रवासीसंख्या पाच लाखांनी वाढल्याचे दिसून आले.


बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ४२ लाख प्रवासी काही वर्षांपूर्वी प्रवास करीत होते. नादुरुस्त बसगाड्या, बस फेऱ्यांमध्ये कपात, बस थांब्यावर तासन् तास करावी लागणारी प्रतीक्षा अशा असंख्य अडचणींमुळे प्रवासी बेस्टकडे पाठ फिरवू लागले होते. गेल्या वर्षभरात प्रवाशांची संख्या २० लाखांपर्यंत घसरली होती.


आर्थिक मदतीसाठी पालिका प्रशासनाने ठेवलेल्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने तिकिटांच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार किमान भाडे पाच तर कमाल भाडे २० रुपये करण्यात आले आहे. वातानुकूलित बस प्रवास, दैनंदिन बस पास आणि मासिक पासचे दरही घटले आहेत. शेअर टॅक्सी-रिक्षाचे प्रवासी बेस्ट बसकडे वळू लागले आहेत.


तिकिटांच्या दरात कपात झाल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसू लागली. वांद्रे-कुर्ला संकुलातील वातानुकूलित प्रवासासाठी लोकांनी गर्दी केली होती. बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नेहमीपेक्षा पाच लाख दोन हजार ८१३ प्रवासी वाढल्याचे दिसून आले.


बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून ८ जुलै रोजी १७ लाख १५ हजार ४४० मुंबईकरांनी प्रवास केला. मात्र प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर ९ जुलै रोजी २२ लाख १८ हजार २५३ लोकांनी प्रवास केला.
प्रवासी वाढले तरी भाड्यात कपात करण्यात आल्यामुळे मंगळवारी बेस्ट उपक्रमाला नेहमीपेक्षा ६६ लाख ९८ हजार ५६३ रुपये उत्पन्न कमी मिळाले.
दररोज सरासरी अडीच
कोटी उत्पन्न बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जमा होत असते. मात्र भाडेकपातीनंतर एक कोटी ४५ लाख ३४ हजार ६९७ रुपये उत्पन्न जमा झाले आहे.
प्रवासी वाढल्याने काही दिवसांत बेस्टच्या उत्पन्नातही वाढ होईल़ यासाठी बेस्ट बस वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत़

बेस्टचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा

सार्वजनिक वाहतूक स्वस्त झाल्याने मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचा बसगाड्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे प्रवासी बसगाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी करीत आहेत. बुधवारी बोरीवली, दादर, परळ येथे बस थांब्यांवर गर्दी दिसून आली. रिक्षासाठी प्रवाशांना १० रुपयांपेक्षा जास्त भाडे द्यावे लागते. परंतु आता बसगाडीने पाच रुपयांत प्रवासी इच्छितस्थळी पोहोचू लागले आहेत. बेस्टचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी परवडणारा आहे, अशीच चर्चा सुरू आहे.

बेस्ट भाडेकपातीपूर्वी कांदिवली ते गोराई यादरम्यान प्रवासाचे भाडे २२ रुपये होते. मात्र, बेस्टची भाडेकपात झाल्यापासून हाच प्रवास १० रुपये झाला आहे. कमी तिकीट दरामुळे पैशांची बचत होऊ लागली आहे. भाडेकपात झाल्यानंतर बेस्टमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली. गर्दी कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने जादा बसगाड्या सोडल्या पाहिजेत.
- नेहा खेडेकर, बोरीवली
दररोज परळ ते दादर असा बसने प्रवास करतो. नेहमीचा प्रवास असल्याकारणाने महिन्याभराचा पास काढतो. भाडेकपातीपूर्वी महिन्याभराच्या पाससाठी ४५० रुपये मोजावे लागत होते. अजून पास संपला नसून आता पासाचे पैसे किती आहेत याचा काही अंदाज नाही. परंतु भाडेकपातीनंतर २५० रुपये महिन्याभराच्या पाससाठी द्यावे लागतील. त्यामुळे प्रवासामध्ये जास्तीचे पैसे वाचतील.
- सुनील गायकवाड, परळ
वरळी ते परळ असा रोजचा प्रवास बेस्टने करावा लागतो. पहिले प्रवास तिकीट १० रुपये होते. आता पाच रुपये झाल्यामुळे बेस्टचा प्रवास परवडत आहे. भाडेकपात झाल्यापासून बेस्टला प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांची संख्या त्वरित वाढविली पाहिजे.
- सोनाल आयरे, परळ

Web Title: Five lakh best traveled in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.