मुंबई सेंट्रल येथे सुरू होणार रेल्वेचे पहिले सायबर सेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:47 AM2019-02-28T05:47:13+5:302019-02-28T05:47:25+5:30

चोरट्यांवर तंत्रज्ञानाची नजर : आरपीएफ जवानांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू

First Class Cyber Cell to be launched at Mumbai Central | मुंबई सेंट्रल येथे सुरू होणार रेल्वेचे पहिले सायबर सेल

मुंबई सेंट्रल येथे सुरू होणार रेल्वेचे पहिले सायबर सेल

Next

मुंबई : मोबाइल आणि लॅपटॉप चोरांचा मागोवा घेण्यासाठी, मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी भारतीय रेल्वेने सायबर सेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे पहिले सायबर सेल पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारण्यात येईल.


मागील वर्षी जानेवारी ते जून महिन्यांदरम्यान मोबाइल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक वस्तू हरविण्याच्या किंवा चोरी होण्याच्या १५ हजार घटनांची नोंद करण्यात आली आहे, यासह मौल्यवान ऐवज चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बलाने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायबर सेल उभारून चोरलेल्या किंवा हरविलेल्या मोबाइलचे जीपीएस आणि लोकेशनद्वारे मोबाइलचा शोध घेणे सोपे होईल.


या संदर्भातील सर्व प्रस्तावांना पश्चिम रेल्वे प्रशासनाची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर, लवकरच सायबर सेल उभारण्यात येईल, यासाठी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ जवानांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारण २८ जवानांची टिम यासाठी काम करेल. सायबर सेलद्वारे मोबाइलची माहिती, कॉल रेकॉर्ड, लॅपटॉप आयपी क्रमांक या सर्व गोष्टी उलगडण्यास सुलभता येणार असल्याची अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली.


मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर उपनगरीय लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सामानाची चढ-उतार केली जाते. मौल्यवान ऐवज चोरांकडून चोराला गेल्याने, हा ऐवज परत मिळणे किंवा चोरांला शोधणे कठीण होते. मात्र, सायबर सेल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रवाशांचे सामान शोधणे सोपे होईल.

सुरक्षित प्रवास करणे सोपे
मुंबई सेंट्रल येथे सायबर सेल सुरू करण्यात येईल. यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. रेल्वे प्रवाशांचे मोबाइल, लॅपटॉप किंवा मौल्यवान ऐवज चोरीच्या घटना वाढत असल्याने, आरपीएफच्या माध्यमातून सायबर सेल उभारण्यात येत आहे. याबाबतचे प्रस्तावांना मान्यता मिळवून कामाला सुरुवात केली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

निश्चित ठिकाण शोधता येणार
मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार असल्यास, सायबर सेलद्वारे मोबाइल चोरास लवकर पकडणे शक्य होईल. वायरलेस प्रक्रियेद्वारे कॉल डाटा रेकॉर्ड करता येऊ शकतो. कॉल डाटा आणि मोबाइलचे टॉवर यांच्याद्वारे मोबाइल चोराचे निश्चित ठिकाण शोधता येते. यासह सीसीटीव्हीच्या मदतीने मोबाइल चोर काय करत आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.

Web Title: First Class Cyber Cell to be launched at Mumbai Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.