उंच इमारत! फायर प्रमाणपत्र कुठे आहे? अग्निशमन दलाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 09:45 AM2024-02-10T09:45:24+5:302024-02-10T09:47:19+5:30

दर सहा महिन्यांनी अहवाल देणे सक्तीचे.  

fire certificate is mandatory for tall buildings bmc announces fire safety policy for tall buildings in mumbai | उंच इमारत! फायर प्रमाणपत्र कुठे आहे? अग्निशमन दलाचा इशारा

उंच इमारत! फायर प्रमाणपत्र कुठे आहे? अग्निशमन दलाचा इशारा

मुंबई : मुंबईत वाढणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून कठोर कार्यवाही करणार आहे. उंच इमारती, सोसायट्यांना फायर ऑडिट बंधनकारक केले आहे. रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींना दर सहा महिन्यांनी ऑनलाइन रिपोर्ट सादर करणे अनिवार्य असणार आहे. अग्निशमन दलाच्या सूचनेचे पालन केले की नाही याची तपासणी करण्यासाठी सरप्राइज व्हिजिट करणार असून यात उपाययोजना केल्या नसल्यास संबंधित इमारतीचे पाणी व वीज कनेक्शन कट करण्यात येईल, असा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे.

गेल्या काही महिन्यात मुंबईत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल्स, दुकाने आदींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून सर्वतोपरी प्रयत्न करूनही मुंबईत आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा बेफिकीरपणा ही कारणीभूत ठरत आहे. 

 भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी इमारतींमध्ये फायर ऑडिट आणि अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत इमारती, झोपडपट्टी, आस्थापने मिळून सुमारे ४० लाख प्रॉपर्टीज आहेत. 

 अशा सर्व ठिकाणी पालिकेला पोहोचून फायर ऑडिट करणे अग्निशमन दलाला शक्य होत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी ॲक्ट मेजर्स ॲक्ट २००६’मधील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी सोसायट्यांना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करावा करावा लागणार असल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मर्यादा येत असल्याने ऑडिट बंधनकारक :

पालिकेकडे ९० मीटर उंचीच्या शिड्या आहेत. मात्र शिड्यांनी केवळ १०० मीटरपर्यंत बचाव कार्य करणे शक्य असते. मात्र यापेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे ४५ मीटरवरील उंच इमारतींमध्ये स्प्रिंकलर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, यंत्रणा चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवणे, आग धोक्याची सूचना देणारा फलक लावणे व ही सर्व यंत्रणा असलेले प्रमाणपत्र इमारत, आस्थापनाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक राहील. हे प्रमाणपत्र प्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांना अधिकृत संकेतस्थळावर  सादर करावे लागणार आहे.

प्रवेशद्वारावर प्रमाणपत्र लावा :

संबंधित हाय राईज इमारतीने फायर ऑडिट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट अग्निशमन दलाला ऑनलाइन सादर करावा. तसेच फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावावे, असे निर्देश अग्निशमन दलाने उंच इमारती, सोसायट्यांना दिले आहेत. मुंबईत ८० टक्के आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे होतात. त्यामुळे इमारतींना इलेक्ट्रिक ऑडिटचीही सक्ती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी पीडब्ल्यूडीसोबत समन्वय साधला जाणार असून इलेक्ट्रिकल सिस्टीमचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: fire certificate is mandatory for tall buildings bmc announces fire safety policy for tall buildings in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.