अखेर गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:14 AM2018-03-30T06:14:00+5:302018-03-30T06:14:00+5:30

पत्रिका मानापमानाचे नाट्य, श्रेयवादाची लढाई आणि स्थानकात प्रचंड गोंधळ अशा

Finally, Harbor Local started up to Goregaon | अखेर गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सुरू

अखेर गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सुरू

Next

मुंबई : पत्रिका मानापमानाचे नाट्य, श्रेयवादाची लढाई आणि स्थानकात प्रचंड गोंधळ अशा वातावरणात गुरुवारी रात्री उशिरा हार्बर गोरेगावपर्यंतचा विस्तार सोहळा पार पडला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खासदार गोपाळ शेट्टी, महिला व बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर आणि आमदार अमित साटम हे व्यासपीठावर उपस्थित होते. सेना-भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि गोंधळामुळे विस्तारीकरण सोहळ्याला लेटमार्क लागला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गोरेगाव ते सीएसटी हार्बर रेल्वेला रात्री १०.०७ वाजता हिरवा कंदील दाखवला.
मुंबईत ७० लोकल गाड्यांमध्ये एसी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकलमध्ये ३ एसी डबे असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने डिसेंबर २०१७ अखेर हार्बर गोरेगाव विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे गोरेगावचे कागदोपत्री हस्तांतरण केले. या वेळी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यात अपुऱ्या मोटरमनमुळे या मार्गावर चालणाºया लोकलवर मनुष्यबळ कोणी नेमावे? यावरून दोन्ही रेल्वेमध्ये वाद उद्भवले होते. अखेर मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात अंधेरीपर्यंतच्या फेºयांचा विस्तार करण्याची तयारी दर्शवली. या दरम्यान रेल्वे सुरक्षा आयोगाने मार्गाची चाचणी घेतली. अखेर तीन महिन्यांच्या काळानंतर हार्बर मार्गावर लोकल धावण्यास सुरुवात झाली.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत हयात नसलेले आमदार प्रकाश सावंत यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तेथे सध्याच्या आमदार तृप्ती सावंत यांचे नाव हवे होते. तर निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे नाव टाळण्यात आले. याबाबत मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५४ च्या नगरसेविका साधना माने यांनी ही बाब निदर्शनास आणत मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी गोंधळाचे वातावरण पाहून उद्योगमंत्री सुभाष देसाई निघून गेले. त्यानंतर वंदे मातरम्, भारतमाता की जय अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. सव्वासातला सुरू होणारा कार्यक्रम सव्वानऊच्या सुमारास सुरू झाला.
बुधवारी ‘प्रॉमिस फुलफिल, गुड न्यूज फॉर गोरेगावकर’ असा मथळा देऊन महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे चिरंजीव व भाजपा वॉर्ड क्रमांक ५० चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी सोशल मीडियावरून या उद्घाटनाचे निमंत्रण पाठवले होते. तर ‘गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वेचा विस्तार करण्यात यावा, यासाठी गेली अनेक वर्षे शिवसेनेने केलेले प्रयत्न हे तमाम गोरेगावकरांना ठाऊक आहेत. सेनेच्या खासदारांनी रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी केलेल्या पाठपुराव्यासंबंधी विशेष हँडबिल आणि पोस्टरच्या माध्यमाने शिवसेनेने भाजपाच्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले.

१ एप्रिलपासून ४९ फेºया : हार्बर गोरेगावच्या उद्घाटनानंतर १ एप्रिलपासून नियमित लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी (२१ फेºया) लोकल फेºयांचे गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात येईल. तर अंधेरी ते सीएसएमटी (२१ फेºया) या गोरेगाव स्थानकातून सूटणार आहे. पश्चिम रेल्वे तर्फे सुरु असलेल्या ६ लोकल फेºयांचे देखील विस्तार गोरेगाव पर्यंत होणार आहे. गोरेगाव ते अंधेरी हे रेल्वे अंतर ११ मिनिटांचे आहे. भविष्यात सीएसटी ते गोरेगाव हार्बर सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारित करणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.
‘राम मंदिर’ची पुनरावृत्ती
१६ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ‘राम मंदिर’ स्थानकाचा उद्घाटन सोहळा झाला होता. या वेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला होता. गोरेगाव विस्तारीकरणावेळीही दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने टोक गाठले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त असल्याने स्थानकाला जणू पोलीस मुख्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Web Title: Finally, Harbor Local started up to Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.