अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईतल्या खार पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:04 IST2018-04-04T14:04:57+5:302018-04-04T14:04:57+5:30
अभिनेता जॉन अब्राहमविरोधात खार पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रेरणा अरोराच्या क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईतल्या खार पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई- अभिनेता जॉन अब्राहमविरोधात खार पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रेरणा अरोराच्या क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटासाठी केलेला करार जॉन अब्राहमनं अचानकपणे संपुष्टात आणला आहे. त्यामुळेच प्रेरणा अरोरा यांनी हे पाऊल उचललं आहे.
जॉन अब्राहमविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात फसवणूक आणि कॉपीराइटचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जॉननं सिनेमाच्या नफ्यातील 50 टक्क्यांचा हिस्सा घेऊन हा करार संपुष्टात आणल्याचा प्रेरणा अरोराचा आरोप आहे. या प्रकरणामुळे 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटाची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटासाठी प्रेरणा अरोरा आणि जॉन अब्राहम यांच्यामध्ये करारही करण्यात आला होता. त्या करारानुसार प्रेरणा अरोरानं जॉन अब्राहमला 30 कोटी दिले होते. एकूण 35 कोटींची रक्कम देण्यासंदर्भात दोघांमध्ये करार झाला होता. या कराराअंतर्गत जॉनच्या मालकीची जे एंटरटेन्मेंट ही कंपनी चित्रपटाची निर्मिती करणार होती. परंतु क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीशी असलेला करार जॉन अब्राहमनं अचानकपणे रद्द केला आहे.