भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, गिरणी कामगारांच्या घराचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:39 AM2019-02-09T04:39:04+5:302019-02-09T04:40:02+5:30

गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राखून ठेवणे शिवसेनेच्या अंगलट आले. भाजपाने हीच संधी साधून रान उठवले, विरोधकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे ही घरे बांधण्यात येणाऱ्या जागेची तातडीने पाहणी करण्यात आली.

In the face of Shiv Sena by the BJP's victory, the path of the mill workers' house is freed | भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, गिरणी कामगारांच्या घराचा मार्ग मोकळा

भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, गिरणी कामगारांच्या घराचा मार्ग मोकळा

Next

मुंबई -  गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राखून ठेवणे शिवसेनेच्या अंगलट आले. भाजपाने हीच संधी साधून रान उठवले, विरोधकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे ही घरे बांधण्यात येणाऱ्या जागेची तातडीने पाहणी करण्यात आली. घरांचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत पुन्हा चर्चेला आणून तत्काळ मंजूर करण्यात आला. भाजपच्या खेळीमुळे गिरणी कामगारांना घर देण्याचे श्रेयही शिवसेनेला आता खिशात घालता येणार नाही.

गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी महापालिका म्हाडाला जमीन हस्तांतरित करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत गुरुवारी चर्चेसाठी आला होता. यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा आक्षेप घेऊन शिवसेनेने हा प्रस्ताव राखून ठेवला होता. भाजपाने आक्रमक भूमिका घेत शिवसेना जाणीवपूर्वक गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न लांबणीवर टाकत असल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षानेही त्याचे समर्थन केल्यामुळे शिवसेना एकटी पडली. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे घरांसाठी प्रस्तावित भूखंडाची पाहणी शिवसेनेने केली.

शुक्रवारी संध्याकाळी सुधार समितीची तातडीने बैठक घेऊन गिरणी कामगारांच्या घरांचा प्रस्ताव चर्चेला मांडण्यात आला. भाजपने हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी लावून धरली. या प्रस्तावाची संपूर्ण माहिती आल्याशिवाय प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय घेणाºया शिवसेनेने आज युटर्न घेतला. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा देण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला. मोकळ्या भूखंडांच्या प्रश्नावरून अडचणीत येण्याची शिवसेनेची ही तिसरी वेळ आहे.

यासाठी देणार म्हाडाला भूखंड
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.
म्हाडाच्या ताब्यातील लहान भूखंडांवर गिरणी कामगारांसाठी घरे उभारणे अवघड आहे. त्यामुळे म्हाडा आपल्याकडील सहा छोटे भूखंड पालिकेला उद्यानासाठी देणार असून त्या बदल्यात एक मोठा भूखंड म्हाडाला मिळणार आहे. त्या जागेवर म्हाडा गिरणी कामगारांसाठी घरे बांधणार आहे.

कला चौकी येथील एमएसटीसी आणि मफतलाल, लोअर परळ येथील व्हिक्टोरिया आणि मातुल्य गिरणी, भायखळा येथील हिंदुस्थान, दादर येथील क्राऊन या गिरण्यांच्या जागा आहेत.
महापालिकेकडे ४७२७ चौरस मीटर आणि म्हाडाकडे ३८७३ चौरस मीटर जागा आहे.

Web Title: In the face of Shiv Sena by the BJP's victory, the path of the mill workers' house is freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.