विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:59 AM2018-03-15T04:59:48+5:302018-03-15T04:59:48+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत, भौतिकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Exhibit of a scientist seeking the creation of the universe | विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट

विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट

Next

अक्षय चोरगे 
मुंबई : ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत, भौतिकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत, विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते, तसेच त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे अवघड विषय सर्वसामान्यांना समजावेत, यासाठी विशेष लिखाण केले आहे.
हॉकिंग यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे खरी, परंतु संशोधन क्षेत्र कोणा एका व्यक्तीसाठी थांबत नाही, ती पोकळी भरून निघेल. त्यांचे संशोधन कार्य पुढे सुरू राहील. संशोधनाच्या त्यांनी रचलेल्या पायावर पुढे मोठी इमारत उभी राहील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. जगाच्या उत्पत्तीसंबंधी रहस्ये उलगडण्यासाठी त्यांचे संशोधन इतर संशोधकांच्या कामी येईल.
>इच्छाशक्तीचे प्रतीक
हॉकिन्स यांनी कृष्णविवरांसंबंधी संशोधनात अतुलनीय काम केले आहे. अपंग असूनही त्यांनी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचे अपूर्ण काम आपण पुढे न्यायचे आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्याचा वेग मंदावेल, परंतु संशोधन कार्य थांबणार नाही. -डॉ. सुधाकर मांडे, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख.
>मृत्यूशी लपाछपी खेळायची सवय
आज ते स्वत: नाहिसे झाले आहेत. आकाशगंगा कशा निर्माण होतात? ‘सिंग्युलॅरिटी’ कशा उद्ध्वस्त होतात? ते समजावले. हॉकिंग नेहमी ब्रह्मांडाची कोडी सोडविण्याच्या धुंदीत असायचे. त्यांनी मृत्यूशी लपाछपी खेळायची सवय होती. हॉकिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच, भाऊसाहेब पाटणकरांची गझल आठवली, ‘अहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे, मेला तरीही वाटेल दुसरा कोणी आम्ही नव्हे.’
- पुष्कर वैद्य, मुख्य शास्त्रज्ञ, इंडियन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी रिसर्च सेंटर.
कृष्णविवरांवर मोलाचे संशोधन
त्यांनी ब्रह्मांडाची उत्पत्ती, कृष्णविवर यांसारख्या विषयांवर मोलाचे संशोधन केले आहे. त्यांचे संशोधन आणि लढवय्या वृत्तीने संशोधकांना, वैज्ञानिकांना, अभ्यासकांना उत्साह मिळतो. त्यांचे ‘ब्रीफ हिस्ट्री आॅफ टाइम’ हे पुस्तक तमाम वैज्ञानिकांना, संशोधकांना संशोधन करण्यासाठी भाग पाडत आहे. त्यांनी सहा दशके संशोधन केले आहे. आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
- सुहास नाईक-साटम, कार्यक्रम समन्वयक (वैज्ञानिक) नेहरू तारांगण.
>विचार निरंतर सोबत राहणार
ते जरी आपल्यामध्ये नसले, तरी त्यांचे संशोधन, विचार मात्र आपल्या सोबत निरंतर राहणार आहेत. विश्वाची जडणघडण कशी होते? ऊर्जा कशी निर्माण झाली, आपले विश्व कसे साकार झाले? याचे संशोधन त्यांनी केले. हॉकिंग यांच्या जाण्याने नुकसान झाले आहे हे खरे, परंतु विज्ञानाचा प्रवास एका व्यक्तीसाठी अडून राहत नाही. हॉकिंग यांनी रचलेल्या पायावर मोठी इमारत उभी राहिल, असा मला विश्वास वाटतो. त्यांनी कृष्णविवरांसंबंधी मौलिक संशोधन केले आहे. पूर्वी असा समज होता कृष्णविवरांमध्ये जबरदस्त गुरुत्वाकर्षण असल्यामुळे, त्यामधून काहीच बाहेर येत नाही, अगदी प्रकाशकिरणेदेखील बाहेर येत नाहीत.
- डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ विज्ञान लेखक.
>हॉकिंग यांनी रचला संशोधनाचा पाया
आल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यानंतर सैद्धांतिक भौतिक शास्त्रात स्टीफन हॉकिंग यांनी सर्वांत जास्त योगदान दिले आहे. विश्वरचना शास्त्र या विषयात त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. सर्वसाधारण सापेक्षता सिद्धान्त आणि पुंज्य सिद्धान्त यांची जोड घालून विश्वाची उत्पत्ती कधी झाली, तिचा प्रसार कसा झाला? यावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. उर्वरित संशोधन आपण आणि नव्या दम्याच्या संशोधकांनी करावयाचे आहे. कृष्णविवरांसंबंधी अनेक समजुती लोकांमध्ये होत्या, त्या खोट्या सिद्ध करून, योग्य संशोधन जगासमोर हॉकिंग यांनी आणले.
-हेमचंद्र प्रधान, माजी संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र.

Web Title: Exhibit of a scientist seeking the creation of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.