महिलांमध्ये खरेदीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:19 AM2017-10-19T07:19:34+5:302017-10-19T07:19:52+5:30

दिवाळी सणानिमित्त मुंबईत खरेदीचे जणू उधाण आले आहे. त्यात दिवाळी म्हटली की महिलावर्गाला खरेदीचा मोठा उत्साह संचारतो, सध्या तो बाजारात दिसून येत आहे.

 The enthusiasm of buying women | महिलांमध्ये खरेदीचा उत्साह

महिलांमध्ये खरेदीचा उत्साह

googlenewsNext

कुलदीप घायवट 
मुंबई : दिवाळी सणानिमित्त मुंबईत खरेदीचे जणू उधाण आले आहे. त्यात दिवाळी म्हटली की महिलावर्गाला खरेदीचा मोठा उत्साह संचारतो, सध्या तो बाजारात दिसून येत आहे.
दादर, मशीद, लालबाग, वांद्रे, फॅशन स्ट्रीट येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त नवनवीन फॅशन ट्रेंड दाखल झालेले आहेत. महिलांसाठी खास प्रकारच्या रांगोळीचे नक्षीकाम असलेले टी-शर्ट बाजारातील नवे आकर्षण आहे. अनारकली, कुर्ती, पारंपरिक जॅकेट, काठ पदर, बलून कुर्ती, मिडल कट कुर्ती, लाचा, क्रॉप टॉप, गोंडा कुर्ती या प्रकारांनाही चांगली मागणी आहे. नेहमीप्रमाणे पारंपरिक ड्रेस, सलवार-कुर्तीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. रांगोळीचे नक्षीकाम असलेले टी-शर्ट हे ३०० रुपये किमतीपासून सुरू होतात. ‘लाचा ड्रेस’ची व वेस्टर्न स्टाईलमधील क्रॉप टॉपची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते. तसेच उत्तम दर्जाचे पारंपरिक जॅकेट, अनारकली, सलवार-कुर्ती ड्रेस १ हजार रुपयांपासून आहे. जॅकेट-कुर्ती ७०० रुपयांपासून आहे. तसेच नऊवारी साडीच्या डिझाईन व स्टाईलमधील ड्रेस, कुर्तीची क्रेझ तरुणींमध्ये सध्या संचारलेली आहे.

ज्वेलरी ट्रेंड
बाजारात दिवाळीनिमित्त नवनवे ज्वेलरीचे फॅशनेबल ट्रेंड दाखल झालेले आहेत. यंदा मोठ्या आकाराचे कानातील दागिने बाजारात उठून दिसत आहेत. कानातील झुंबके विविध आकारांत आणि प्रकारांतही उपलब्ध आहेत. भौमितीक, अलंकारित आकारांतील कानातील मुलींच्या पसंतीचे आहेत. मोरपंखी, रंगीबेरंगी झुंबके, स्टोन रिंग, ग्लास रिंग, साधे रिंग अशा सर्व प्रकाराच्या कानातल्यांची किंमत ५० रुपयांपासून सुरू होत आहे. मोतीमणी हार, सुकी स्टायलिस नेकलेस, सुकी मॉडिस नेकलेस, गोंडा नेकलेस अशा प्रकाराच्या विविधरंगी नेकलेसची किंमत २०० रुपयांपासून सुरू होत आहे.

कॉस्मेटिक ट्रेंड
नेहमीप्रमाणे महिलावर्ग सजण्यास सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. यंदा डोळ्यासाठीचे लायनर नवीन प्रकारातही उपलब्ध आहेत. लिपस्टिकच्या नवनवीन शेड्सही आकर्षण ठरत आहेत. डार्क लिपस्टिकला अधिक पसंती असल्याचे विक्रेते सांगतात. भडक लाल रंगाच्या लिपस्टिकचा खप अधिक होत आहे. डार्क रंगामधील मेकअप साहित्य अनेक रेंजमध्ये उपलब्ध आहे.

सध्या बाजारात विविध प्रकारचे नवनवीन ड्रेस, ज्वेलरी सेट आलेले आहेत. त्यामुळे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. दिवाळी सर्वांत मोठा सण आहे. त्यामुळे खरेदीदेखील मोठ्या प्रमाणावर करत आहोत. यंदा वस्तू थोड्या महाग झाल्या असल्या तरी खरेदीही उत्साहात सुरू आहे.
- राजश्री रामटेके, ग्राहक

पारंपरिक ड्रेसला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच खूप सारे नवीन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहक आपल्या पसंतीने खरेदी करत आहेत. विविध दुकानांत विविध रेंज उपलब्ध असल्याने ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
- अली सय्यद, विक्रेता

जुने ते सोने
खूप वर्षांपूर्वी गोंड्याचे कानातले, नेकलेस तसेच ड्रेसच्या काठ-पदरावर गोंड्याचा वापर केला जात असे. यंदाच्या दिवाळीत अशा गोंड्याला नवीन रूप देऊन गोंड्याचा ट्रेंड आलेला आहे. त्यामुळे ‘जुने ते सोने’ ही म्हणदेखील खरी ठरत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title:  The enthusiasm of buying women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी